पालघरवासीय सर्दी, तापाने बेजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरवासीय सर्दी, तापाने बेजार
पालघरवासीय सर्दी, तापाने बेजार

पालघरवासीय सर्दी, तापाने बेजार

sakal_logo
By

वसई, ता. १३ (बातमीदार) : बदलत्या हवामानाचा व प्रदूषणाचा फटका पालघर जिल्ह्यात बसू लागला आहे. यामुळे नागरिकांना सर्दी, ताप, घसा दुखणे, कणकण, तसेच खोकल्याने ग्रासले आहे. या आजारातून काही दिवसांत रुग्ण बरा होत असला तरी मात्र अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी साथीच्या आजारात काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
पालघरमध्ये मोठ्याप्रमाणात नागरिकरण होत आहे. तसेच अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ आहे. हवेत धूलिकण अधिक मिसळत असल्याने हवामान खराब होत आहे. अशातच थंडी तर कधी उन्ह असे मिश्र वातावरण असल्याने नागरिकांना साथीच्या आजरांना तोंड द्यावे लागत आहे. काही नागरिक घरगुती उपचार घेत असून अन्य रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत.
जव्हार ते वसई विरार शहरापर्यंत अनेक नागरिक ताप, सर्दी, खोकला व घसादुखीने बेजार झाले आहेत. विषाणूजन्य आजार असला तरी योग्यवेळी उपचार घेतल्याने तो लवकर बरा होतो; मात्र प्रतिकारशक्ती कमी असल्यास थकवा जाणवत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. प्रदूषण वाढत असल्याने हा बदल जाणवत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या रुग्णालयात जाऊन उपचार करावे, याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासन व वसई विरार महापालिकेकडून करण्यात आले आहे.
----------------------
मिश्र वातावरणाचा परिणाम शरीरावर होत असतो. ताप, सर्दी, खोकला आदींची लक्षणे वाटल्यास नागरी आरोग्य केंद्रात तपासणीसाठी जावे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार करावेत. खबरदारी म्हणून पाणी उकळून प्यावे, जंक फूड, तेलकट खाणे टाळावे.
- डॉ. स्मिता वाघमारे, वैद्यकीय अधिकारी
----
अचानक खोकला, तापाची लक्षणे आढळली. त्यानंतर घसा दुखू लागला, त्यामुळे दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार केल्यावर बरे वाटले.
- रॉबी रेमेडीयस, रुग्ण
-------------------
तापामुळे अशक्तपणा आला होता. त्यामुळे काही खाण्याची इच्छा होत नव्हती. प्रथम घरगुती उपचार केले, त्यानंतर बरे वाटत नसल्याने पाच दिवस औषध घेतल्यावर ताप गेला. पण अशक्तपणा काही प्रमाणात आहे.
- मंगल बनसोडे, रुग्ण
--------------------
काय सांगतात डॉक्टर...
उघड्यावरचे पाणी पिऊ नये
उकळून पाणी प्यावे
तेलकट, तिखट पदार्थ टाळा
शिंक, खोकला आल्यास तोंडावर रुमाल ठेवा
सार्वजनिक ठिकाणी फिरताना काळजी घ्या.
प्रथिने असलेले पदार्थ खावेत