तीन गावांसाठी टँकर पुराण कायमचे संपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन गावांसाठी टँकर पुराण कायमचे संपले
तीन गावांसाठी टँकर पुराण कायमचे संपले

तीन गावांसाठी टँकर पुराण कायमचे संपले

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ ः प्रचंड पाऊस पडणाऱ्या खालापूर भागातील अनेक गावांमध्ये फेब्रुवारीपासूनच टँकर येत असे; मात्र गोदरेज ॲण्ड बॉयस इंडस्ट्रीजने ग्रामस्थांच्या सहभागातून प्रयत्न केले आणि तीन गावांमधील टँकर पुराण कायमचे संपल्याची माहिती ग्रामस्थांनी ‘सकाळ’ला दिली.
गोदरेज ॲण्ड बॉयसच्या खालापूरमधील दोनशे एकर जमिनीवरील प्रकल्पाला नुकतीच काही पत्रकारांनी भेट दिली. केवळ नफा मिळवण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीतून शेजारच्या परिसराचा विकास करण्याच्या तत्त्‍वानुसार गोदरेज ॲण्ड बॉयसने येथील ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या. नोकऱ्यांसाठी गोदरेज ॲण्ड बॉयसच्या गेटवर येणाऱ्या ग्रामस्थांना पाणी, शेती आणि कौशल्य विकासासाठी मदत करताना महिला सक्षमीकरणावरही भर देण्यात आला. त्यामुळे परिसरातील वडवळ, तांबाटी या गावांचा चेहरामोहराच बदलला. फुकट सर्व काही देण्यापेक्षा लोकसहभागातून कामे केल्याने त्यांचे महत्त्‍वही ग्रामस्थांना पटले.

असा झाला कायापालट
गोदरेज ॲण्ड बॉयसने येथील साडेसहा हेक्टर जमीन वनखात्याकडून दत्तक घेतली. त्यावर दहा आदिवासी कुटुंबांना नोकरी मिळालीच; पण ग्रामस्थांच्या साह्याने येथे मोठ्या प्रमाणावर वनीकरण केले. ४२ शेतकऱ्यांच्या साह्याने दोनशे एकर जमिनीवर शेती केली जाईल. लिफ्ट इरिगेशनसाठी आदिवासी ग्रामस्थांनी तीस लाख रुपये दिल्यावर उरलेली रक्कम गोदरेज ॲण्ड बॉयसने तसेच सरकारने अनुदानस्वरूपात दिली. या जमिनीतील फळभाज्या सुपरमार्केटला पाठवल्या जातील. गोदरेजने परिसरात सहा साठवण बंधारे व सात मोठ्या टाक्या बांधल्या. त्यामुळे तीन गावांचा टँकर कायमचा संपला, असे पाणी समितीचे अध्यक्ष बिपीन भोसले म्हणाले.

महिलांचे सक्षमीकरण
गोदरेजने ५० महिलांना छोटे व्यवसाय करण्यास मदत केली. स्वयंसेवी संस्थांच्या साह्याने तेथील ६५० महिलांचे ६३ स्वयंसहाय्य गट करून त्यांनी बनवलेली उत्पादने मोठ्या बाजारपेठेत पाठवण्यात आली. आत्मविश्वास कमावलेल्या या महिला आता ग्रामसभेत प्रश्न विचारून सरपंचांवरही वचक ठेवतात, अशी माहिती प्रगती कदम, कविता सकपाळ यांनी दिली. सरकारी शाळांमधील मुलांचे इंग्रजी सुधारण्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आले. गोदरेज ट्रेनिंग सेंटरमधून स्थानिकांना स्वस्तात कुशल प्रशिक्षण मिळाल्याने ते स्वयंपूर्ण झाले, असेही ग्रामस्थ जितेंद्र सकपाळ म्हणाले.