मिरा-भाईंदरमधील झोपडपट्ट्यांसाठी एसआरए | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदरमधील झोपडपट्ट्यांसाठी एसआरए
मिरा-भाईंदरमधील झोपडपट्ट्यांसाठी एसआरए

मिरा-भाईंदरमधील झोपडपट्ट्यांसाठी एसआरए

sakal_logo
By

भाईंदर, ता.१३ (बातमीदार): मिरा-भाईंदर शहरातील झोपडपट्टीधारकांसाठी एसआरए योजना लागू करण्यात येईल, तसेच धोकादायक इमारतींचा पुनर्विकास ठाण्यातील क्लस्टर योजनेच्या धर्तीवर केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाईंदर येथे केली. मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्‍या स्थानिकांना हवे त्याचप्रमाणे होईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
संस्कृती मिरा-भाईंदर आर्ट फेस्टिवलच्या सांगता कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राई मोर्वा गावात होणाऱ्‍या नियोजित कारशेडच्या स्थलांतराबाबतही सकारात्मक संकेत दिले. या भागातील प्रस्तावित मेट्रो कारशेडचे स्थलांतर करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. पण मेट्रो कारशेड स्थलांतरासाठी ग्रामस्थांनी दिलेले सर्व पर्याय व्यवहार्य नसल्याचा अहवाल एमएमआरडीएने मुख्यमंत्र्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. राई मोर्वा येथील कारशेडला होत असलेल्या विरोधाची दखल घेण्यात आली आहे. लोकांच्या विरोधात जाऊन कोणतेही काम होणार नाही. लोकांना हवे तेच होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
विकासासोबतच नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्याची आवश्यकता असते. आपली संस्कृती, परंपरा पुढे न्यायचे काम अशा कला महोत्सवाच्या माध्यमातून होत असते असे सांगून प्रताप सरनाईक फाऊंडेशन व संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कला महोत्सवाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
....
इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी क्लस्टर
मिरा-भाईंदर शहरात एकूण छोट्या मोठ्या ३६ झोपडपट्ट्या आहेत. यातील काशी मिरा भागातील दोन झोपडपट्यांसाठी केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेतून पक्की घरे देण्यात येणार आहेत. पण ही योजना आता केंद्र सरकारने गुंडाळली आहे. त्यामुळे उर्वरित झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी एसआरए योजना लागू करावी तसेच शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला असल्यामुळे त्यांनाही दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी, मिरा-भाईंदरमधील झोपडपट्ट्यांसाठी एसआरए योजना लागू करण्यात येईल तसेच ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी ज्याप्रमाणे क्लस्टर योजना राबवण्यात येत आहे त्याच धर्तीवर मिरा-भाईंदरमध्येही क्लस्टर योजना राबवण्यात येईल अशी घोषणा केली.
.....
कुमार विश्वास यांचे खुमासदार चिमटे
सुप्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांच्या कवितांचा कार्यक्रम या महोत्सवात झाला. आपल्या विविध कविता सादर करताना कुमार विश्वास यांनी खुमासदार शैलीत सर्वच राजकीय पक्षांना चिमटे देखील घेतले. कार्यक्रमाला खासदार राजेंद्र गावित, आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता, गिल्बर्ट मेन्डोन्सा, मुझफ्फर हुसेन आदी उपस्थित होते.