शिवसैनिकांच्या शाखा नूतनीकरणांचा धडाका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसैनिकांच्या शाखा नूतनीकरणांचा धडाका
शिवसैनिकांच्या शाखा नूतनीकरणांचा धडाका

शिवसैनिकांच्या शाखा नूतनीकरणांचा धडाका

sakal_logo
By

शहापूर, ता. १३ (बातमीदार) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटात शिवसैनिकांच्या मेळाव्यांचा आणि शाखा नूतनीकरणांचा धडाका सुरू केला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमध्ये घेण्यात येणाऱ्या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून ठाणे जिल्हा परिषदेवर भगवा फडकावणारच, असा निर्धार या मेळाव्यांमधून केला जात आहे.
नुकत्याच झालेल्या शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये या शिवसेनेने बाजी मारली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही निर्विवाद भगवा फडकावण्याचा ठाम निर्धार जिल्हा परिषद गटात घेण्यात येणाऱ्या मेळाव्यांमध्ये केला जात आहे. शहापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे १४ गट असून, तालुक्यातील किन्हवली, मळेगाव, गोठेघर, चेरपोली, बिरवाडी व आवाळे या जिल्हा परिषद गटात झालेल्या मेळाव्यांना उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या मेळाव्यांच्‍या माध्यमातून कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला जात असून पक्ष वाढीसाठी ध्येय धोरणे आखली जात आहेत. शाखा नूतनीकरणाच्या माध्यमातून कातबाव, नडगाव, दहिगाव यांसह विविध ठिकाणी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडीच्या नियुक्त्या करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात येत आहे. पुढील महिनाभरात उर्वरित शिरोळ, मोखावणे, साकडबाव, डोळखांब, वासिंद, आसनगाव, नांदगाव व सोगाव या गटांमध्ये मेळावे होणार असून, शाखा नूतनीकरणाची मोहीम राबवण्यात येणार असल्याचे तालुकाप्रमुख बाळा धानके यांनी सांगितले. या मेळाव्यांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी लोकसभा संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख विश्वास थळे, उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, जिल्हा सचिव काशिनाथ तिवरे, तालुकाप्रमुख बाळा धानके, विठ्ठल भेरे यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होत आहेत.