मंदोसची छाया गडद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंदोसची छाया गडद
मंदोसची छाया गडद

मंदोसची छाया गडद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : बंगालच्या उपसागरावर ‘मंदोस’ चक्रीवादळ प्रतिताशी १० किमी वेगाने वायव्य दिशेला सरकत आहे. त्याचबरोबर मध्य पूर्व अरबी समुद्रात चक्रिय स्थिती निर्माण झाली असून याचे पडसाद रायगडमध्ये दिसू लागले आहेत. सोमवारी सायंकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मंदोसची छाया अधिक गडद होत आहे. ऊन-सावलीचा लपंडाव सुरू असून गारठाही वाढला आहे. समुद्रातील वाऱ्याचा वेग वाढल्‍याने खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेले मच्छीमारही बंदरात परतू लागले आहेत.
उत्तर केरळ ते मध्य पूर्व अरबी समुद्रापर्यंत तयार झालेली चक्रिय स्थिती तसेच १३ डिसेंबरला किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या दोन्ही स्थितीमुळे इतर जिल्ह्याप्रमाणे रायगड जिल्ह्यात हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे.
पाच-सहा दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीत जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, बुधवारपासून पाऊस कमी होईल, तुरळक ठिकाणीच पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पश्चिम किनारपट्टीवर पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, शेतकरी बांधवांनी पिके मळणी, कापणीसाठी तयार असतील, तर ती पिके सुरक्षित ठिकाण ठेवावीत, असा सल्ला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.

आपत्ती यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना
चक्रिय परिस्थितीमुळे अतिवृष्टीची शक्यता असल्याने जनावरेही सुरक्षित ठिकाणी बांधावीत, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह वादळी वारे व मध्यम ते हलका पाऊस असल्याने विजा चमकण्याची शक्यता आहे. गडगडाटी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्‍यता असल्‍याने नागरिकांनी खुल्या, मोकळ्या ठिकाणी थांबू नये, विजेचे खांब, झाडाजवळ उभे राहू नये. विद्युत उपकरणापासून दूर राहावे. चक्रिय परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

भातमळणीसाठी शेतकऱ्यांची घाई
रायगड जिल्ह्यात भातमळणीची कामे सुरू आहेत. ढगाळ वातावरणामुळे पाऊस केव्हाही पडण्याची शक्यता असल्याने भातमळणीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांची घाई वाढली आहे. भाताची मळणी केल्यानंतर पिकातील आर्द्रता वाढू नये म्हणून धान्य घरात न आणताच थेट भात खरेदी-विक्री केंद्रावर पाठवण्याची लगबग सुरू आहे.

मच्छीमार बंदरात परतले
समुद्रात लाटा उसळत असल्‍याने मच्छीमारांनी खोल समुद्रातील नौका परत बंदरात आणून ठेवल्या आहेत. ढगाळ वातावरणामुळे मासळी सुकवण्यास जागा नसल्‍याने मच्छीमारांचेही नुकसान होऊ लागले आहे.

नियंत्रण कक्षाची स्थापना
कोणत्याही आपत्कालीनप्रसंगी जवळच्या तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या ०२१४१-२२२०९७/२२२११८ व ८२७५१५२३६३ अथवा टोल फ्री क्रमांक ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

चक्रिय स्थितीमुळे वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. याचे पडसाद रायगड जिल्ह्यातही दिसू शकतात. आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता असल्‍याने जिल्हा प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाकडून येणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे.
- सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, अधिकारी