
अभ्यास पुर्ण करणाऱ्या आठ वर्षीय मुलाला लाईटरचे चटके
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : ईव्हीएस विषयाचा अभ्यास पूर्ण न केल्याने एका खासगी शिकवणीचालक महिलेने आठ वर्षीय विद्यार्थ्याला लाईटरने हाताला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार वाशीमध्ये उघडकीस आला आहे. सोनी तिवारी असे या महिलेचे नाव असून वाशी पोलिसांनी या महिलेविरोधात मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. वाशी, सेक्टर-३ भागात राहणाऱ्या सोनी तिवारी या आपल्या घरामध्ये खासगी शिकवणी चालवतात. त्यांच्या शिकवणीत त्याच भागात राहणारा पीडित विद्यार्थीदेखील जातो. ९ डिसेंबर रोजी सायंकाळी हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी गेला होता; मात्र त्याने ईव्हीएस विषयाचा अभ्यास पूर्ण केला नव्हता. त्यामुळे शिकवणीचालक सोनी तिवारी यांनी त्या विद्यार्थ्याच्या डाव्या हाताला लाईटरने आगीचा चटका दिला. हा प्रकार त्याने रात्री आपल्या आई-वडिलांना सांगितला. सुरुवातीला त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र या विद्यार्थ्याच्या हाताला ज्या ठिकाणी लाईटरचा चटका देण्यात आला होता, त्या भाजलेल्या ठिकाणी फोड येऊन जखम झाली. त्यानंतर या मुलाच्या पालकांनी दुसऱ्या दिवशी मुलाला भाजलेल्या ठिकाणी उपचार घेतले. त्यानंतर सोमवारी सांयकाळी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मुलाच्या हाताला लाईटरने चटके देणाऱ्या खासगी शिकवणी चालक महिलेविरोधात कलम ३२४ सह मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.