नागरी विकासकामांवरून अधिकाऱ्यांना तंबी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरी विकासकामांवरून अधिकाऱ्यांना तंबी
नागरी विकासकामांवरून अधिकाऱ्यांना तंबी

नागरी विकासकामांवरून अधिकाऱ्यांना तंबी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ ः महापालिकेतर्फे विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या नागरी सुविधा कामांना वेग देऊन त्यांची विहित वेळेत पूर्तता करा, अशा सूचना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांना समाधानकारक सेवा उपलब्ध करून देण्याकडे सर्व विभागप्रमुखांनी विशेष लक्ष देण्याचे निर्देशही नार्वेकर यांनी विभागांच्या घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये दिले.
‘इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स’ या केंद्र सरकारतर्फे जाहीर निवासयोग्य शहरांच्या स्पर्धेमध्ये नागरिकांच्या अभिप्रायाला महत्त्व असून जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिकांनी आपले शहराविषयीचे अभिप्राय नोंदवावेत. या दृष्टीने मुख्यालयाप्रमाणेच विभाग पातळीवरूनही नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी अधिक व्यापक प्रयत्न पालिकेने सुरू केले आहेत. याचबरोबर पीएम स्वनिधीअंतर्गत फेरीवाल्यांना बँकांमार्फत व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासह ज्या फेरीवाल्यांची कागदपत्रे पूर्तता झालेली आहेत, त्या फेरीवाल्यांना बँकांमार्फत कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बँक व्यवस्थापनाशी संपर्क ठेवून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही केले जाणार आहेत. शिवाय ज्या मार्केटच्या इमारती बांधून तयार आहेत, अशा मार्केटमधील जागांचे वाटप करून लवकरात लवकर हे मार्केट नागरिकांच्या सोयीसाठी कार्यान्वित करण्यात येणार असल्याच्या सूचना विभागवार आयुक्तांनी दिले आहेत.
--------------------------------
आरोग्य सेवा बळकटीला प्राधान्य
घणसोली, सेक्टर ९ येथे नव्याने बांधण्यात आलेली नागरी आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण झालेली असून त्या ठिकाणी नवीन नागरी आरोग्य केंद्र सुरू करण्याची कार्यवाही तत्परतेने करण्यात येणार आहे. तसेच कोपरखैरणे विभागातही २ नागरी आरोग्य केंद्रांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून त्या ठिकाणचे आवश्यक फर्निचर, औषधसाठा व मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आत्तापासूनच कार्यवाही सुरू केली जाणार आहे.
--------------------------
स्पर्धा परीक्षांसाठी विशेष तयारी
‘झोपडपट्टी तेथे ग्रंथालय’ संकल्पनेअंतर्गत १० ग्रंथालयांपैकी ६ ग्रंथालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून ४ ग्रंथालयांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्या ठिकाणी ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी व पुस्तक निवडताना सर्व वयोगटातील वाचकांना आवडतील, अशी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तके उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच या पुस्तकांमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील, अशा पुस्तकांचा समावेश केला जाणार आहे.