
दीर्घ आजारी रुग्णांना सायन रुग्णालयाचा आधार
मुंबई, ता. १३ : सायन रुग्णालयात पालिकेचे पहिले पॅलिएटिव्ह केअर केंद्र सुरू करण्यात येणार आहे. येत्या नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात अशी सुविधा सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न असून दीर्घकाळ आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी तिथे मोफत उपचार उपलब्ध असतील. पहिल्यांदाच असा प्रकल्प सायन रुग्णालयात प्राथमिक स्वरूपात राबवला जाणार आहे. त्यानंतर केईएम, नायर आणि कूपरसारख्या प्रमुख रुग्णालयांमध्येही सुविधा सुरू केली जाईल.
ओपीडी आणि आंतर रुग्णालयात पॅलिएटिव्ह केअरची सुविधा असणार आहे. शिवाय, एक विशेष पॅलिएटिव्ह ओपीडी सायन रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर चालवली जाईल. स्नेहा संस्थेच्या सह संस्थापक डॉ. अरमेडा फर्नांडिस यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार सर्व प्रमुख रुग्णालयांच्या अधिष्ठाता, संचालक आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याशी बैठक झाली होती. त्यात असे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सायन रुग्णालयाच्या औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सीमा बनसोडे यांनी सांगितले.
पॅलिएटिव्ह केअर केंद्राअंतर्गत औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या डॉक्टरांसह मेडिसीन, मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक इत्यादींकडून सर्वांगीण उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.
पॅलिएटिव्ह केअर म्हणजे काय?
दुर्धर आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी पॅलिएटिव्ह केअर केंद्राची गरज असते. केंद्राचे मुख्य उद्दिष्ट वेदनाशामक आजारांवर उपचार करणे असते. गंभीर आजारांशी झगडणाऱ्या रुग्णांचे आयुष्य सुसह्य करणे, आजाराची लक्षणे आणि उपचारांचे दुष्परिणाम, त्याचबरोबर आजारासोबत येणाऱ्या भावनिक, सामाजिक आणि व्यावहारिक समस्या हाताळण्याचे काम पॅलिएटिव्ह केअरद्वारे केले जाते. म्हणूनच पालिकेने असे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोफत सुविधा
पहिले तीन महिने प्राथमिक स्तरावर प्रकल्प राबवला जाईल. सिप्ला फाऊंडेशनतर्फे डॉक्टर आणि परिचारिका पुरवल्या जातील. त्यानंतर औषध वैद्यक शास्त्र विभाग पॅलिएटिव्ह केअरसोबत एकत्रित मिळून काम करतील. प्रकल्पाअंतर्गत डॉक्टरांचे समुपदेशन, उपचार आणि इतर काळजी मोफत पुरवली जाईल. ओपीडी स्तरावर सुविधा दिली जाईल. केंद्राबाबत जागरुकता केली जाणार आहे. त्याअंतर्गत सर्व विभागांतील प्रमुख, प्राध्यापक, निवासी डॉक्टर्स आणि इंटर्न यांनाही माहिती दिली जाणार आहे.