विद्यार्थ्यांना वळण देण्याचे काम शिक्षक, पालकांनी करावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांना वळण देण्याचे काम शिक्षक, पालकांनी करावे
विद्यार्थ्यांना वळण देण्याचे काम शिक्षक, पालकांनी करावे

विद्यार्थ्यांना वळण देण्याचे काम शिक्षक, पालकांनी करावे

sakal_logo
By

चेंबूर, ता. १४ (बातमीदार) ः शिक्षण हे दळण नसून वळण आहे. विद्यार्थ्यांना वळण देण्याचे काम शिक्षक व पालकांनी करणे काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. सुनील कदम यांनी केले आहे. ‘सकाळ’च्या वतीने ‘नववी व दहावी विद्यार्थ्यांकरिता परीक्षा आता बिनधास्त!’ या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन वरळी येथील एस. व्ही. एस. स्कूल व गिरगाव येथील आर्यन हायस्कूल शाळेतील सभागृहात केले होते. या प्रसंगी ते बोलत होते. बोर्डाच्या परीक्षेचे आव्हान समर्थपणे पेलण्यासाठी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाची लस गरजेची आहे. याकरिता विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक व पालकांची भूमिका महत्त्‍वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
कदम यांनी सांगितले की, परीक्षेची भीती मनात ठेवू नका. भीती असते ती या भावनेची की, परीक्षाच सर्व काही आहे! याला कारणीभूत आपल्या आजूबाजूची मंडळी असतात. म्हणूनच पालकांनी हे ध्यानात घ्या, की परीक्षा हेच आयुष्य नव्हे, तो आयुष्यातला एक लहान टप्पा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण देऊ नका. त्यांना धीर द्या, असा सल्‍लाही त्‍यांनी या वेळी दिला. विद्यार्थ्यांनी स्वतःसमोर निश्चित ध्येय ठेवणे आवश्यक आहे. परीक्षेत एकूण किती टक्के व प्रत्येक विषयात किती गुण मिळवायचे, हे प्रत्येकाने स्वतःपुरते ठरवायला हवे. ते ठरवताना स्वतःच्या क्षमतेचा विचार करून त्यांचा अधिकाधिक वापर करायला हवा. धावण्याच्या शर्यतीत शेवटच्या टप्प्यात वेग वाढवणारा नेहमीच जिंकतो. तसेच या शेवटच्या टप्प्यात अभ्यासाचा वेग वाढवून विद्यार्थी परीक्षेत सहज यशस्वी ठरू शकतो. त्यासाठी वेळेचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. बदलत्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेची भीती न बाळगता त्याला आत्मविश्‍वासाने जावे, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजेंद्र आवारी यांनी केले; तर आभार मुख्याध्यापिका भावना उमराळे यांनी मानले.
या कार्यक्रमाला शिक्षण विकास समूह यांचे एसव्हीएस इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष परशुराम गुजर, मुख्याध्यापक हनुमान पाडमुख, उपाध्यक्ष देवदास कदम, सचिव अंजली देसाई; तर आर्यन हायस्कूलचे मुख्याध्यापिका भावना उमराळे, शिक्षक वर्ग अनंत सोलकर, भावेश घोडके, प्रमोद सुरवाडे, वंदना नागर गोजे, भाऊसाहेब माने यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.

मोलाचे सल्‍ले
१) विद्यार्थ्यांनो, आहार व्यवस्थित घ्या!
परीक्षेच्या काळात विद्यार्थी अभ्यास करताना त्याच्या मेंदूचे काम वाढलेले असते आणि अभ्यासाच्या ताणाने मेंदू थकलेलाही असतो. त्याकरिता मुलांना ‘व्हिटॅमिन-बी’ पदार्थ, सर्व प्रकारची फळे, दू्ध आणि दुधाचे पदार्थ, अंड्याचा पांढरा भाग, दूध, पालक, बदाम, कार्बोहायड्रेटस आणि प्रोटिन्स कार्बोहायड्रेटस, आवडीचे पदार्थ, वरण भात, बटाटे, उसळ, अंडी, तूप पदार्थ, पाणी, नारळ पाणी, लिंबू ,कोकम सरबत, सूप, ताक खायला द्या. त्यामुळे मुलांच्या शरीर व मेंदूला लाभ होतो.

२) तणावमुक्त राहा!
आहाराप्रमाणे योगासने, अनापना ध्यानसाधना, पुरेशी झोप घेणे. परीक्षाकेंद्रात वेळेआधी जा. प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा व उत्तरपत्रिकेवर आवश्यक माहिती अचूकपणे भरा. प्रश्नपत्रिका सोडवताना योग्य प्रश्न क्रमांक लिहा. महत्त्वाचे शब्द अधोरेखित करा. उत्तरपत्रिका पूर्ण लिहून झाल्यावर एकदा वाचा. काही चुका असल्यास आवर्जून दुरुस्त करा. अंतर्गत मूल्यमापनात अधिकाधिक गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. तणावमुक्त राहा, काळजी करू नका.

३) कौशल्य
वाचन, लिखाण, स्मरण, पाठांतर, पाढे, सोप्या पद्धतीने तंत्रकौशल्यांबरोबर विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आपल्या जीवनाचे ध्येय साध्य करण्याकरिता सातत्य पूर्ण प्रयत्न करणे. आत्मविश्वास, सकारात्मक, मनाची एकाग्रता, या पंचसूत्रावर विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा डोलारा उभा असतो. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, परीक्षेच्या समस्यांना तोंड कसे द्यावे, याबाबत मार्गदर्शन करणयात आले.