एकाच डॉक्टरवर खर्डी रुग्णालयाची मदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकाच डॉक्टरवर खर्डी रुग्णालयाची मदार
एकाच डॉक्टरवर खर्डी रुग्णालयाची मदार

एकाच डॉक्टरवर खर्डी रुग्णालयाची मदार

sakal_logo
By

खर्डी, ता. १३ (बातमीदार) : खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयातील एका डॉक्टरने आपल्या खासगी कामासाठी २० दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकाच डॉक्टरवर रुग्ण तपासणी करण्याची मदार असल्याने डॉक्टरांना २४ तास ड्युटी करावी लागत आहे. त्यामुळे येथील आरोग्यसेवाच आजारी पडल्याचे दिसून येत आहे.

येथे सध्या कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला शहापूर ग्रामीण रुग्णालयाचा प्रभारी अधिभार दिल्याने त्यांना २४ तास शहापुरातून दोन्ही रुग्णालयाचे काम पाहावे लागत आहे. परिणामी रुग्णालयाची स्थिती असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाविरोधात रुग्ण संताप व्यक्त करत आहेत. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असल्याने दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यावरच आजारी पडण्याची पाळी आली आहे. खर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या ३० खाटांच्या रुग्णालयासाठी २७ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असूनही येथे केवळ १४ कर्मचाऱ्यांवर हे रुग्णालय सुरू आहे. १३ कर्मचारी इतरत्र शासकीय रुग्णालयात काम करीत असल्याचे समजते. त्यातच गेल्या २० दिवसांपासून एका डॉक्टरने राजीनामा दिल्याने ठाण्यातून नवीन डॉक्टरची नेमणूकही केली होती; परंतु ते हजर न झाल्याने येथील एकाच डॉक्टरवर हे रुग्णालय सुरू आहे.

खर्डी परिसरात ६० गावे व ३० पाडे आहेत. मुंबई-आग्रा महामार्ग आणि मध्य रेल्वे यांच्या मध्यवर्ती ठिकाणी खर्डी ग्रामीण रुग्णालय आहे. आदिवासी भागात काम करण्यास कर्मचारी तयार होत नसल्याने शासनाचीही पंचाईत झाली आहे. परिसरातील रुग्णासह महामार्गावरील व रेल्वेच्या अपघातग्रस्तांना तात्काळ औषधोपचार मिळावा या उदात्त हेतूने सरकारने हे रुग्णालय सुरू केले होते. रुग्णालयात दररोज सुमारे १०० ते १५० रुग्णांची तपासणी होत असते. तसेच रात्री-अपरात्री अपघातग्रस्त रुग्णही येथे आणले जातात.
-----------
खर्डी ग्रामीण रुग्णालयासाठी राजीनामा दिलेल्या डाक्टरांच्या जागेवर शहापूर येथून तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा चिकित्सक, ठाणे

----------
खर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम टप्प्यात आले आहे. ही इमारत भव्यदिव्य स्वरूपात बांधली गेली असल्याने या रुग्णालयात ५० खाटा उपलब्ध करून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून हे रुग्णालय सुरू करावे.
- असिफ शेख, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, ठाणे.