प्राध्यापकांचे वेतन रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राध्यापकांचे वेतन रखडले
प्राध्यापकांचे वेतन रखडले

प्राध्यापकांचे वेतन रखडले

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : विभागीय सहसंचालक, कोकण विभाग यांच्या अधिपत्याखालील सुमारे सव्वाशे महाविद्यालयातील साडेतीन हजारांहून अधिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबरचे वेतन अजून न मिळाल्यामुळे वेतनाअभावी कर्मचाऱ्यांची परवड होत आहे. अनेकांचे कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. त्यामुळे या अध्यापकांचे नोव्हेंबरचे वेतन त्वरित देण्याबाबत सर्व संबंधितांना तसे आदेश द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव तसेच याच विभागाचे संचालक यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालयाने राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दर एक तारखेला अदा करण्याबाबत विभागीय सहसंचालकांना आदेश देऊनदेखील एक तारखेला वेतन मिळत नसल्याची गंभीर तक्रार धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेने प्रधान सचिवांकडे केली आहे. शासनाचा वरील आदेश लक्षात घेता महाराष्ट्र भरातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला मिळावे, अशी मागणी या संघटनेने प्रधान सचिवांकडे केली आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कर्जाचे हप्ते साधारणपणे दहा तारखेच्या आत संबंधित कर्ज देणाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे अपेक्षित असते. उशिरा हप्ते भरल्याने दंड भरावा लागतो, शिवाय सिबिल ही खराब होतो. तसेच मुलांची शैक्षणिक फी, परिवारातील मंडळींची औषधे, वीजबिले, जीवनाशक वस्तू आदी बाबींचे वेतनाअभावी नियोजन कोलमडते. त्यामुळे वेतनाअभावी होणारा हा आर्थिक व मानसिक छळ थांबवावा, अशी मागणी महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेने प्रधान सचिवांकडे केली आहे.