मुंबईत बेकायदेशीर ऑर्केस्ट्राबारवर कारवाईचे वाढते सत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत बेकायदेशीर ऑर्केस्ट्राबारवर कारवाईचे वाढते सत्र
मुंबईत बेकायदेशीर ऑर्केस्ट्राबारवर कारवाईचे वाढते सत्र

मुंबईत बेकायदेशीर ऑर्केस्ट्राबारवर कारवाईचे वाढते सत्र

sakal_logo
By

ऑर्केस्ट्राच्या नावाने बारमध्ये ‘छमछम’ सुरूच!
मुंबईत बेकायदा बारवरील कारवाईला पुन्हा वेग

केदार शिंत्रे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ऑर्केस्ट्रा बारवर कारवाईचे सत्र वाढले आहे. ऑर्केस्ट्राच्या नावावर बेकायदा डान्स बार चालवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांचे छापासत्र सुरू आहे. विनापरवाना सुरू असलेले ऑर्केस्ट्रा बारही पोलिसांच्या रडारवर आहेत. कोविड लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळातील निर्बंधांमुळे बारचालकांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. त्या काळात बहुतेक बार बंद असल्यामुळे कारवायांचे प्रमाण घटले होते; मात्र लॉकडाऊननंतर काही प्रमाणात बेकायदा ऑर्केस्ट्रा बारची संख्या वाढल्याने मुंबई पोलिसांच्या कारवायांना वेग आल्याचे सांगितले जात आहे.

--
ग्राफिक्स
पोलिस कारवाईत ५० टक्के वाढ
२०२१ ः बेकायदा ऑर्केस्ट्रा आणि डान्स बारमधून मुक्त महिला ः १४
कारवाई करण्यात आलेले आरोपी ः १३
गुन्हे नोंद ः ८
- २०२१ च्या तुलनेत यंदा जवळजवळ ५० टक्के कारवाया वाढल्या

जाने. ते नोव्हें. २०२२ ः बेकायदा ऑर्केस्ट्रा-डान्स बारमधून मुक्त महिला ः १२९
कारवाई करण्यात आलेले आरोपी ः १३१
गुन्हे नोंद ः २३

----------

मुंबईतील महिनाभरातील प्रमुख कारवाया
वरळी, ३ डिसेंबर
३ डिसेंबर रोजी वरळी भागातील एका बेकायदा ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने पहाटे छापा टाकला. किमान २३ जणांना अटक केली. १३ महिलांची सुटका करण्यात आली. १ लाख ७ हजाराची रोकड, लॅपटॉप व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

कांदिवली, १९ नोव्हेंबर
सामाजिक सेवा शाखेने मध्यरात्रीच्या सुमारास कांदिवली-चारकोप न्यू लिंक रोडवरील रांगोळी बार आणि रेस्टॉरंटवर छापा टाकून ६० जणांना अटक केली. बारमध्ये अश्‍लील नृत्यांसह बेकायदा कृत्ये केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. बार मॅनेजर, कॅशियर, वेटर्स, एक ऑर्केस्ट्रा कलाकार, ४० हून अधिक ग्राहक आणि सात पीडित मुलींसह एकूण ६० जणांना ताब्यात घेण्यात आले.

घाटकोपर, ११ नोव्हेंबर
घाटकोपर पंत नगरमधील ९० फूट रोडवर असलेल्या बेकायदा ऑर्केस्ट्रा बारवर ११ नोव्हेंबर रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास पोलिसांनी छापा मारला. २३ जणांना अटक करून १३ महिलांची सुटका करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश...
ऑर्केस्ट्रा-डान्स बार रात्री ११.३० वाजेपर्यंतच सुरू राहतील. नोकरदार महिलांचे शोषण होऊ नये म्हणून त्यांचे कंत्राट असावे. बारबालांना मासिक वेतन न देण्याचा नियम न्यायालयाने रद्द केला आहे. बारमध्ये ऑर्केस्ट्रा ठेवण्याची परवानगी होती. त्याच वेळी बार आणि डान्स स्टेज वेगळे करण्याची तरतूद रद्द करण्यात आली. बारमध्ये कोणत्याही प्रकारचे अश्लील नृत्य होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. बार डान्सरना टीप दिली जाऊ शकते; परंतु त्यांच्यावर पैसे उडवण्यास मनाई असेल.

महाराष्ट्र सरकारचे नियम...
- ऑर्केस्ट्रा-डान्स बारमध्येच सीसीटीव्ही बसवण्यात यावेत. त्याचे फुटेज जवळच्या पोलिस ठाण्यात दिले जाईल.
- बारबाला म्हणून फक्त चार मुली काम करू शकतील. त्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे
- ऑर्केस्ट्रा-डान्स बारमधील ग्राहक आणि मुलींमध्ये दोन मीटरचे अंतर असावे

ऑर्केस्ट्रा-डान्स बारचा इतिहास
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील गरीब कृषी क्षेत्रातील तरुण महिला बारमालकांच्या लक्षात आल्या आणि त्यांनी त्यांना दारू देण्यासाठी कामावर ठेवण्यास सुरुवात केली. त्याला ‘वेटर सर्व्हिस’ असे नाव देण्यात आले. हे ‘सायलेंट बार’ होते. नंतर काहींनी त्यांच्या जागेवर ऑर्केस्ट्रा सेवा सुरू केली. जेव्हा चित्रपटांमध्ये आयटम नंबर्ससारखी गाणी येऊ लागली, तेव्हा बारमध्ये गायक आणि उत्तेजक कपडे घालून नाचू शकतील अशा मुली ठेवल्या गेल्या. १९८४ मध्ये महाराष्ट्रात नोंदणीकृत बारची संख्या केवळ २४ होती. डान्स बार बंदी व्हायच्या पूर्वी २००५ मध्ये त्यांची संख्या १५०० च्या जवळ पोहोचली. त्यापैकी एकट्या मुंबईत ७०० बार होते.

मुंबईत ऑर्केस्ट्रा आणि डान्स बारचा एक मोठा वाटा काळा पैसा कमावण्यात आहे. राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्याने काही वेळेस त्यास वरदहस्त जबाबदार आहे. एवढेच नाही, तर प्रशासनातील अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून अशा पद्धतीने बेकायदा बार चालवले जातात.
- धनराज वंजारी, माजी पोलिस अधिकारी