
जागृत नागरिकांनी रोखली गुटखा वाहतूक
मनोर, ता. १३ (बातमीदार) : मनोरच्या जागृत नागरिकांच्या सतर्कतेमुळे गुटखा वाहतूक करणारी कार जप्त करण्यात आली आहे. सोमवारी रात्री मनोर-पालघर रस्त्यावर ग्रामस्थांनी संशयित कारचा पाठलाग करून कार थांबवून गुटख्याची तस्करी रोखली. या कारमधून गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, कारचालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मनोर-पालघर रस्त्यावर हात नदी पुलावरून मनोरच्या दिशेने जात असलेल्या कारमधून दमण बनावटीची दारू वाहतूक करीत असल्याचा संशय आल्याने ग्रामस्थांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चालकाने कार भरधाव वेगाने पुढे नेली. या वेळी पाठलाग सुरू असल्याचे समजताच चालकाने कार सोडून पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी गुटख्यासह कार जप्त केली असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोर पोलिसांनी जप्त केलेला गुटखा मनोरमधील गुटखा वितरक नाझीम सिद्दिकी याने गुजरात राज्यातून मनोर परिसरात विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर येत आहे.