
शेतकरी, शेतमजुरांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
पालघर, ता. १३ (बातमीदार) : ओला दुष्काळ जाहीर करा, खावटी अनुदान ताबडतोब द्या, अशा अनेक मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व आदिवासी यांनी आज जव्हार येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यकर्त्यांसह आंदोलन केले.
या वेळी किसान पराग पष्टे यांनी वारंवार मागणी करूनही शासन शेतकरी व कष्टकऱ्यांची चेष्टा करत असल्याचे सांगून या मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा दिला. पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, कार्याध्यक्ष बळवंत गावित, मधुकर चौधरी, जव्हार तालुका अध्यक्ष संपत पवार, विक्रमगड तालुका अध्यक्ष घनश्याम आळशी, वाडा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, पालघर जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, एकनाथ वेखंडे, मोखाडा तालुका अध्यक्ष जमशेद लारा यांच्यासह ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. या वेळी आंदोलकांनी ओला दुष्काळ जाहीर करा, खावटी अनुदान त्वरित मिळावे, अल्पभूधारक भूमिहीन आदिवासी यांचे प्रलंबित वनपट्टे दावे मंजूर करावेत, वनपट्टेधारकांना सात-बारा त्वरित देण्यात यावा, रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करण्यात यावीत, भात खरेदी भ्रष्टाचाराबाबत एसआयटीमार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी, विभक्त रेशन कार्डधारकांना त्वरित रेशन मिळावे आदी मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिले.