विकासकामात आराखड्याला बगल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासकामात आराखड्याला बगल
विकासकामात आराखड्याला बगल

विकासकामात आराखड्याला बगल

sakal_logo
By

भिवंडी, ता. १४ (बातमीदार) : भिवंडी महानगर क्षेत्रात पालिकेकडून गेल्या वीस वर्षांपासून नव्याने बांधण्यात येणारी गटारे आणि पदपथ हे विकास आराखड्यानुसार बांधले जात नसल्याने शहराच्या विकासाला बाधा येत आहे. नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याने विकास आराखड्यानुसार न बांधलेली गटारे, पदपथ आणि स्वच्छतागृहांची चौकशी करण्याची मागणी दक्ष नागरिकांकडून होत आहे.
शहरात नवीन बांधकाम, दुरुस्तीचे बांधकाम अथवा सुधारित बांधकाम करण्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी पालिकेच्या नगरविकास विभागातून दिली जाते. मात्र, महापालिकेच्या बांधकामासाठी अथवा दुरुस्तीसाठी नगररचना विभागाकडून अभिप्राय अथवा परवानगी घेतली जात नाही, असे दिसून आले आहे. गेल्या २०-३० वर्षांपासून महापालिकेत निवडून आल्यानंतर नगरसेवकांनी प्रामुख्याने शहर विकासाची कामे करताना शहरात नव्याने गटारे आणि त्यावर पदपथ बांधण्याकडे जास्त लक्ष दिले. शहरात दुरुस्ती करून रस्ते बनविण्यास प्राधान्य दिले. हे करत असताना शहराच्या विकास आराखड्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
सुधारणांचा पत्ताच नाही
शहरात अनेक ठिकाणी विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरण न करता सिमेंटचे रस्ते बनविले; परंतु अशा कामात पालिकेच्या शहर विकास अथवा नगररचना विभागातील अधिकारी, अभियंता आणि संबंधित कर्मचारी यांनी हस्तक्षेप केला नाही. पालिकेतील बांधकाम विभागाचे तत्कालीन शहर अभियंता आणि या विभागांतर्गत काम करणारे अभियंता यांनी देखील दुर्लक्ष केले. त्यामुळे शहरातील नागरिकांचे पैसे आणि सरकारचा निधी खर्च होऊन देखील शहरवासीयांना या सुधारणांचा योग्य लाभ मिळालेला नाही.
--------------------------------------------------------------------------------------
चौकशी करणे गरजेचे
गेल्या वीस वर्षांपासून शहरात विकासाच्या नावाखाली गटारे दुरुस्ती, नव्याने गटारे, पदपथ आणि स्वच्छतागृहे बांधणी यासाठी पालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. मात्र, शहरातील बकालपणा कमी झाला नाही. ही कामे करताना पालिकेच्या शहरविकास व नगररचना विभागाने हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे गेल्या वीस वर्षांपासून झालेल्या विकासकामांची चौकशी राज्याच्या नगरविकास विभागाकडून करण्यात यावी, अशी मागणी दक्ष नागरिक रामदास दानवले यांनी केली आहे.
--------------------------------------------------------------------------------------
भिवंडी महापालिका प्रशासनाने शहरात विकासकामे करताना शहराच्या विकास आराखड्यानुसार केली पाहिजेत. त्यामुळे नागरिकांपर्यंत सुविधा पोहचू शकतात आणि नागरिकांची गैरसोय दूर होते. रस्ते, गटारे आणि पदपथ हे नागरिकांच्या सोयीसाठी बनले पाहिजेत. ही कामे झाल्यानंतर त्याचा उपयोग नागरिकांसाठी झाला पाहिजे. सध्या मी नव्याने शहर अभियंता म्हणून महापालिकेत रुजू झालो आहे. त्यामुळे विकासकामे करताना विकास आराखड्याचा विचार केला जाईल.
- सुनील घुगे, शहर अभियंता, भिवंडी महापालिका.