Sun, Feb 5, 2023

आयटीआयच्या मेळाव्यात २८१ उमेदवारांची निवड
आयटीआयच्या मेळाव्यात २८१ उमेदवारांची निवड
Published on : 14 December 2022, 10:20 am
अंबरनाथ, ता. १४ (बातमीदार) : अंबरनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्यात २८१ उमेदवारांची विविध कंपन्यांनी शिकाऊ उमेदवारी रोजगारासाठी निवड केली. युवकांना कौशल्य विकासासोबत रोजगार मिळावा, यासाठी नवी दिल्ली येथील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मंत्रालयाकडून अंबरनाथच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये अंबरनाथ, कल्याण व ठाणे जिल्हा परिसरातील ४६ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या मेळाव्यासाठी सुमारे ५१० उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी २८१ उमेदवारांची कंपन्यांनी शिकाऊ उमेदवारी रोजगारासाठी निवड केली, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य महेश जाधव यांनी दिली.