
युवा सामर्थ्य प्रतिष्ठानचा सेवारत्न पुरस्काराने सन्मान
जव्हार, ता. १४ (बातमीदार) : आपले मानवाधिकार फाऊंडेशनच्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या युवा सामर्थ्य प्रतिष्ठानच्या कार्याची दखल घेण्यात आली. प्रतिष्ठानला मानाच्या ‘सेवारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे राज्यस्तरीय एकदिवसीय अधिवेशन आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडले. देशातील तेरा राज्यात काम करणाऱ्या आपले मानवाधिकार फाऊंडेशनतर्फे जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून या अधिवेशनादरम्यान आपले अधिवेशन, दिनदर्शिका प्रकाशन व विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. समाजातील तळागाळात शेवटच्या घटकापर्यंत काम करणाऱ्या नामवंत व्यक्ती, सामाजिक संस्थांचा सन्मान या अधिवेशनात करण्यात आला. या पुरस्कारांमध्ये सेवारत्न पुरस्कार, सेवाभूषण पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, नारीशक्ती पुरस्कार व आरोग्यदूत पुरस्कार अशा प्रकारचे पुरस्कार देऊन अनेकांचा सन्मान करण्यात आला.