
संत रोहिदास मार्गावरील फेरीवाल्यांची मनमानी
धारावी, ता. १४ (बातमीदार) : संत रोहिदास मार्गावर फेरीवाल्यांनी रस्ता अडवून ठेवल्याने पादचाऱ्यांना व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर फेरीवाले गाड्या लावून व्यवसाय करत असल्याने अर्ध्यापेक्षा अधिक रस्ता व्यापला गेला आहे. यामुळे रस्त्यावरून चालणे कठीण होत आहे. शीव रेल्वे स्थानकाकडून धारावीच्या दिशेने वांद्रे व माहीमच्या दिशेला जाणारा संत रोहिदास मार्ग हा मुंबईतील मुख्य रस्त्यांपैकी एक रस्ता आहे. शहर व उपनगर यांना जोडणारा मुख्य दुवा आहे. या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली की, त्याचा ताण मुंबईतील वाहतुकीवर होतो; तरीही वाहतूक पोलिस व पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एखाद्या पादचाऱ्याने फेरीवाल्यास हटकले की, सर्व फेरीवाले संघटित होऊन त्या पादचाऱ्यावर हल्लाबोल करतात. यामुळे पादचारी व फेरीवाले यांच्यात शाब्दिक चकमकी होतात. फेरीवाल्यांवर अनेकांचा आशीर्वाद असल्याने फेरीवाले निर्धास्तपणे दादागिरी करतात, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. पालिका व वाहतकू पोलिसांनी यातून मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे.