क्षयरोगविरोधी लढ्यासाठी कृती आराखडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षयरोगविरोधी लढ्यासाठी कृती आराखडा
क्षयरोगविरोधी लढ्यासाठी कृती आराखडा

क्षयरोगविरोधी लढ्यासाठी कृती आराखडा

sakal_logo
By

वसई, ता. १४ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या क्षयरोग विभागाकडून घरोघरी तपासणी करण्यात येत असल्याने रुग्ण समोर येत आहेत. त्यातच आता महापालिकेने क्षयरोगावर नियंत्रण मिळावे, तसेच रुग्णांवरील उपचारात सुसूत्रता यावी, यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार व्यापारी, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच रुग्णांना दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
वसई-विरार महापालिकेने क्षयरोग रुग्ण निदान करण्यासाठी मोहीम हाती घेतली. त्यामुळे या रुग्णांना वेळेवर उपचार घेणे शक्य होत आहे. क्षयरुग्णांवरील उपचारासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. या काळात रुग्णांचा रोजगार बुडतो. त्यामुळे औद्योगिक संस्था, औद्योगिक संघटना, व्यापारी संघटना, व्यवसाय गट यांचा क्षयरोगाविरुद्धच्या या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. या कृती आराखड्याबाबत आरोग्य विभागाचे उपायुक्त विजयकुमार द्वासे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी बैठकदेखील पार पडली. यात आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती जोशी, क्षयरोग विभागाचे प्रमुख राजेश चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
----------------
२७ लाख इतके भारतामध्ये नवीन क्षयरुग्ण आढळतात
४.१ लाख रुग्णांचा क्षयरोगामुळे मृत्यू होतो.
२०२५ पर्यंत देशातून क्षयरोग संपविण्याचा भारत सरकारचा संकल्प आहे.
५ लाख क्षयरुग्ण विनानिदानाचे राहतात.
-----------------
असा आहे कृती आराखडा
क्षयरोगाविषयी कलंक आणि भेदभाव दूर करणे.
विविध ठिकाणी जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन.
निदान व उपचाराची माहिती, साह्य.
कामगारांची तपासणी, उपचारासाठी मदत.
रुग्णांना दत्तक घेण्यासाठी निक्षय मित्रांचा सहभाग वाढवणे
-----------------
औद्योगिक संस्था, औद्योगिक व व्यापारी संघटना, व्यवसाय गट, अशासकीय संस्था, सामाजिक संस्था यांनी क्षयरुग्णांना सामाजिक, आर्थिक, अन्नधान्य स्वरूपात साह्य करावे. यामुळे या रुग्णांना आशेचा नवा किरण मिळेल.
- डॉ. राजेश चव्हाण, क्षयरोग विभाग, महापालिका