
यंदा कांद्याचा ‘बाजार’ उठला
वाशी, ता.१४ (बातमीदार) ः अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. त्याचा परिणाम एरव्ही शंभरी गाठणारा कांदा बाजारात सरासरी ७ ते १४ रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह वाढीव भाव मिळेल, या आशेवर असणारा व्यापारी देखील हवालदिल झाला आहे.
सध्या शेतकऱ्यांनी कांदा खराब होण्यापेक्षा विक्रीस काढल्याने बाजार समित्यांमध्ये पुरेसा कांदा आवक सुरूच आहे. परिणामी, कांदा दरात घसरण सुरू असून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी ७ ते १४ रुपये प्रतिकिलो कांदा विकला जात आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये एकूण १६० गाडी आवक झाली असून जवळ १०० कांद्याच्या गाड्या बाजारात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी दरवाढ होईल, या आशेने आत्तापर्यंत कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता. मात्र, राज्यातील अनेक ठिकाणी नव्या कांद्याची लागवड सुरू झाली तरी चाळीतील कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने व्यापारी चिंताग्रस्त झाला आहे. कांदा चाळीतील ५० टक्के कांदा सडला असून उरलेला कांदा खराब होऊ लागला आहे. परराज्यांतील कांदा बाजार समित्यांमध्ये आल्याने दरात घसरण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बाजार समितीमध्ये अधिक प्रमाणात कांद्याची आवक होत असून मागणी नसल्याने दरवाढीला ब्रेक लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
-----------------------
वातावरणाचा परिणाम
सध्या राज्यात अनेक ठिकाणी झालेला पाऊस, बदलते वातावरण, अनेक भागांतील थंडी याचा परिणाम कांद्यावर होत असून एरवी दरात उच्चांक गाठणाऱ्या कांद्याचे दर काही दिवस असे राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच आणखी काही दिवस दरवाढ होणार नसल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
------------------------
खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दिवाळी
कांदा, बटाटा महाग झाल्यावर वडा-पाव, कांदा-भजी, सॅंडविच विक्रेत्यांनी खाद्यपदार्थांचे भाव वाढवले होते. मात्र सध्या बाजारात कांदा ७ ते १४ रुपये, तर बटाट्याचे दर २० रुपयांनी घसरल्यानंतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी भाव कमी केले नाहीत. त्यामुळे काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची होळी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दिवाळी झाली आहे.