
डेब्रिज वाहतुकीबाबतचे पालिकेचे परिपत्रक मागे
मुंबई, ता. १४ : मुंबई महापालिकेने डेब्रिज वाहतुकीबाबत काढलेले परिपत्रक रद्द केले आहे. मुंबईतील हवा खराब झाल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला होता. मुंबईत सुरू असणाऱ्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांच्या तसेच विविध प्रकल्पाच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या डेब्रिजची वाहतूक करू नये, असे पालिकेकडून सर्व विभागांना एका पत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले होते; परंतु अवघ्या एकाच दिवसात हा निर्णय मागे घेण्याची वेळ महापालिकेवर आली. महापालिकेने दहा दिवसांसाठी डेब्रिजची वाहतूक रोखली होती.
मुंबईत सुरू असणाऱ्या जी-२० बैठकीच्या निमित्ताने डेब्रिज वाहतुकीला मज्जाव करण्यात आल्याची चर्चा होती; परंतु ही बंदी का हटवण्यात आली, याचे कारण मात्र समोर आले नाही. मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या ठिकाणी कचरा जाळण्याचा मुद्दा अमिताभ कांत यांनी उचलून धरला होता. त्यामध्ये मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडच्या ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार थांबायला हवेत, असेही मत मांडले होते.