वाड्यात दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाड्यात दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू
वाड्यात दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू

वाड्यात दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू

sakal_logo
By

वाडा, ता. १४ (बातमीदार) : तालुक्यातील बिलोशी या गावच्या हद्दीत असलेल्या महिंद्रा रोझीन अॅण्ड टर्पेटाईन या कंपनीतील भट्टी साफसफाई करण्यासाठी टॅंकमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, कामगाराच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला आहे.
सचिन बाळकृष्ण भोईर (रा. बिलोशी) व सचिन यशवंत करले (रा. गोऱ्हे) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुण कामगारांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बिलोशी या गावाच्या हद्दीत महिंद्रा रोझीन अॅण्ड टर्पेटाईन ही रासायनिक कंपनी आहे. या कंपनीतील भट्टी साफ करण्यासाठी मंगळवारी रात्रीच्या सुमारास एक कामगार उतरला होता. आतील रसायनाच्या वासामुळे तो गुदमरल्याने आरडाओरडा करू लागला, त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी दुसराही कामगार भट्टीमध्ये उतरल्याने तोही गुदमरल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
कंपनी प्रशासनाकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही साधन सामग्री नसल्याने या कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे सांगून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कंपनीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. हा अपघात कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झाल्याने प्रत्येकी दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान, वाडा तहसीलदार कार्यालयात कंपनीचे मालक व मृतांचे नातेवाईक यांच्यात झालेल्या चर्चेत मृत कामगाऱ्यांच्या नातेवाईकांना सात लाख नुकसानभरपाई देण्याचे कंपनी मालकाने मान्य केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्याचे मान्य केल्याचे समजते. याप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास वाडा पोलिस करत आहेत. दरम्यान, कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याने कंपनी मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी केली आहे.