
Avtaran Diwali Ank 2022 : सकाळच्या ‘अवतरण’वर ‘अक्षरबंध’ची सर्वोत्कृष्ट मोहोर
मुंबई : नाशिक येथील ‘अद्वैत अक्षरबंध प्रतिष्ठान’च्या २०२२ च्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, यात ‘अवतरण’ या ‘सकाळ’ मुंबई आवृत्तीच्या दिवाळी अंकाची ‘सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक’ म्हणून निवड करण्यात आली. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.समाजजीवनाला प्रभावित करणाऱ्या विषयावर दिवाळी अंक प्रकाशित करण्याची ‘सकाळ’ मुंबई आवृत्तीची परंपरा असून, या वर्षीचा अंक धर्मकारणावर भाष्य करणारा आहे. त्यात हिंदुत्वाचा सर्वांगीण वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या अंकासाठी लेखन केले आहे. महात्मा गांधी, विनोबा भावे, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मकारणासह स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिदुत्व, शिवसेनेच्या हिंदुत्वावरही या अंकात चिंतन आहे.
वैदिक धर्माचा आचार, हिंदुत्व आणि भारतीय राजकारण, धर्मचिकित्सेचे अंनिस मॉडेल अशा विविध विषयांवरील लेख या अंकात आहेत. करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्या नृसिंह भारती, डॉ. यशवंत मनोहर, पन्नालाल सुराणा, सत्यपाल महाराज चिंचोळकर, दलाई लामा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, अभिनेते शरद पोंक्षे, अजित अभ्यंकर, स्वरा भास्कर आदी विविध क्षेत्रांतील लेखकांनी या अंकासाठी लेखन केले आहे.
वाचन चळवळीमध्ये शतकोत्तर परंपरा असलेल्या दिवाळी अंकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना काळातही दिवाळी अंकांनी आपली ही परंपरा सुरू ठेवली. म्हणूनच ‘अक्षरबंध’च्या वतीने या राज्यस्तरीय पुरस्कारांची सुरुवात केली. प्रतिष्ठानचे प्रवीण जोंधळे, सप्तर्षी माळी, साई बागडे, सुवर्णा घुगे, कल्याणी बागडे, डॉ. गणेश मोगर आणि योगेश विधाते यांनी पुरस्काराची घोषणा केली. याशिवाय उल्लेखनीय अंक म्हणून ‘माझा’ या दिवाळी अंकाचा गौरव करण्यात आला. स्वानंद बेदरकर यांचा ‘शब्द मल्हार’; आंतरभारती, व्हाईट स्पेस आणि किशोर या दिवाळी अंकांचाही सन्मान करण्यात आला.