
निर्देशांकांची सलग दुसरी तेजी
मुंबई, ता. १४ ः जगातील प्रमुख देशांमधील चलनवाढ कमी झाल्याच्या उत्साहात गुंतवणूकदारांनी आज (ता. १४) खरेदी केल्याने सेन्सेक्स व निफ्टी पाव टक्के वाढले. सेन्सेक्स १४४.६१ अंश, तर निफ्टी ५२.३० अंश वाढला.
अमेरिका, इंग्लंड व भारतातील चलनवाढ नियंत्रणात असल्याचे समोर आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. विशेषतः अमेरिकेची फेडरल बँक आता व्याज दरवाढीबाबत जास्त आक्रमक भूमिका घेणार नाही, या अपेक्षेत खरेदी झाली. एफएमसीजी वगळता सर्वच क्षेत्रे आज नफ्यात होती. त्यातही रिअल इस्टेट व गृहकर्ज पुरवठादार कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. अमेरिकी आयटी कंपन्यांच्या शेअरचे दर वाढल्याने भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअरचीही खरेदी झाली. त्यामुळे दिवसअखेर सेन्सेक्स ६२,६७७.९१ अंशांवर, तर निफ्टी १८,६६०.३० अंशांवर स्थिरावला.
----
या शेअर्समध्ये वाढ
सेन्सेक्समधील फक्त नेस्ले, आयसीआयसीआय, एअरटेल, एशियन पेंट, हिंदुस्थान युनिलीव्हर या शेअरचे भाव एक ते दोन टक्के कमी झाले; तर टेक महिंद्र, टाटा स्टील, स्टेट बँक, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, डॉ. रेड्डीज लॅब, एचडीएफसी, टीसीएस, एचडीएफसी बँक या शेअरचे भाव एक ते दोन टक्के वाढले.