केडीएमससीला ऊर्जा संवर्धनासाठीचा प्रथम पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडीएमससीला ऊर्जा संवर्धनासाठीचा प्रथम पुरस्कार जाहीर
केडीएमससीला ऊर्जा संवर्धनासाठीचा प्रथम पुरस्कार जाहीर

केडीएमससीला ऊर्जा संवर्धनासाठीचा प्रथम पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : विजेची बचत ही काळाजी गरज असून सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी पालिका प्रशासन विविध स्तरांवर उपक्रम राबवत आहे. ऊर्जा बचतीबाबत केलेल्या उपक्रमांच्या सादरीकरणाला कल्याण डोंबिवली महापालिकेस महापालिका व हॉस्पिटल इमारत या दोन संवर्गातून १७ वा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे. सौरऊर्जा यंत्रणातून १८ कोटी युनिटची बचत महापालिकेने केली आहे, तर विजेची बचत करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात आल्या आहेत. या पुरस्कारामुळे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. केडीएमसीच्या या उपक्रमांमुळे राज्यपातळीवर पालिका प्रशासनास मोठा बहुमान मिळाला आहे.

‘मेडा’ या महाराष्ट्र शासनाच्या नोडल एजन्सीमार्फत (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण) म्युन्सिपल सेक्टर, हॉस्पिटल सेक्टर यामध्ये ऊर्जा बचतीबाबत केलेल्या उपाययोजनांची, राबवलेल्या उपक्रमांची माहिती या वर्षीच्या १७ व्या राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पुरस्कारासाठी सर्व महापालिका स्तरावर मागवण्यात आली होती. पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या नेतृत्वाखाली व शहर अभियंता अर्जुन आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या विद्युत विभागाने नेमून आराखड्यामध्ये ऊर्जा संवर्धन व ऊर्जा बचतीसाठी स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा, जल, मलनिस्सारण या विभागामध्ये जे काम केले, त्या संदर्भातील माहिती सप्टेंबर महिन्यात पाठवली होती. तसेच २२ नोव्हेंबरला महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या निवड समितीसमोर विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी ऊर्जा बचतीबाबत केलेल्या उपाययोजनांचे, राबवलेल्या उपक्रमांचे सादरीकरण केले होते.
महापालिका क्षेत्रात परंपरागत जुने सोडियम दिवे काढून ऊर्जा बचतीसाठी स्मार्ट एलईडी दिवे बसविण्यात आले, तसेच महापालिकेने नवीन इमारतींना सौरऊर्जा यंत्र बसविणे बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने, आतापर्यंत सुमारे १ हजार ८१४ इमारतींवर १ कोटी एलपीडी क्षमतेचे सौर उष्ण जल संयंत्रे व ३५ इमारतींवर ०.५ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती करणारे प्रकल्प विकासकांकडून इमारतींवर बसवल्यामुळे संपूर्ण शहरात १८ कोटी युनिटची विजेची बचत होत आहे.

ऊर्जा बचतीसाठी नवे पंप
---------------------------
पाणीपुरवठा करणारे जुने पंप बदलून महापालिकेने नवीन प्रकारचे ऊर्जा बचतीचे पंप बसवले आहेत. रुक्मिणीबाई रुग्णालयात ऊर्जा बचतीसाठी जुने परंपरागत दिवे काढून नवीन एलईडी दिवे, तसेच ऊर्जा कार्यक्षम उद्वाहन यंत्रणा व वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. या उपक्रमांमुळेच आज पालिकेला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून आणखी एक मानाचा तुरा पालिकेच्या शिरपेचात खोवला गेला आहे.