
मुंबईत लवकरच जम्बो स्वीमिंग पूल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः मुंबईत पश्चिम उपनगरात तरुणवर्गासाठी तसेच लहान मुलांसाठी मुंबई महापालिका विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सहा जम्बो स्वीमिंग पूल उभारण्यात येणार आहेत. सहापैकी दोन स्वीमिंग पुलांचे काम मुंबई महापालिकेकजून पूर्ण करण्यात आले आहे. मालाड आणि दहिसर येथील पुलांचे काम पूर्ण झाले आहे, तर वरळी आणि अंधेरी येथील पुलाचे काम २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.
मालाड आणि दहिसर येथे तयार करण्यात आलेले स्वीमिंग पूल हे मोठ्या क्षमतेचे आहेच. या ठिकाणी एका महिन्यात १६०० जण या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या ठिकाणी वर्षाला आठ हजार रुपये इतकी फी आकारली जाणार आहे. लहान मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी अनुभवी कोचची टीम या ठिकाणी नेमण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने सहा ठिकाणी स्वीमिंग पूल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी मालाड आणि दहिसर येथे काम पूर्ण झाले आहे. या दोन स्वीमिंग पूल बांधणीसाठी पालिकेने १७ कोटी रुपये इतका खर्च केला आहे. नव्या वर्षात हे पूल वापरायला मिळणार आहेत. पालिकेने सदस्य नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.
...
येथे असणार स्वीमिंग पूल
सद्यस्थितीला शिवाजी पार्क (दादर), मुलुंड, चेंबूर, कांदिवली आणि अंधेरी शहाजी राजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे स्वीमिंग पूल आहेत. वरळी, चाचा नेहरू गार्डन (मालाड पश्चिम), इंदिरा गांधी मनोरंजन पार्क (अंधेरी पश्चिम), कोंडीविता (अंधेरी पूर्व), राजर्षी शाहू महाराज कॉम्प्लेक्स, टागोरनगर (विक्रोळी पूर्व), ज्ञानधारा गार्डन (दहिसर) या ठिकाणी नवीन पूल तयार करण्यात येत आहेत.
...
लवकरच वॉर्डनिहाय...
मुंबई महापालिकेने यंदा २३ ऑगस्टपासूनच आपल्या स्वीमिंग पूल नोंदणी अभियानाला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात अतिशय माफक शुल्कासह सदस्य नोंदणी करण्यात आली आहे. या नोंदणीला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या प्रतिसादामुळेच पालिकेने प्रत्येक वॉर्डात स्वीमिंग पूल तयार करण्यासाठी योजना आखली आहे.