
सीएसएमटी स्थानकातील स्टॉल आगीत खाक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४/१५ वरील एका स्टॉलला आग लागण्याची घटना आज सकाळी घडली. या आगीमुळे रेल्वे स्टॉल जळून खाक झाला. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली, याची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वरील एका स्टॉलला बुधवारी सकाळी साडेसहा वाजता आग लागली. या आगीत स्टॉलमधील सर्व सामान जळून खाक झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन यंत्र आणि अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीमुळे मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही; मात्र या घटनेमुळे काही काळ रेल्वे स्थानकात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागाकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.