ढगाळ हवामानामुळे काकडी उत्पादक हवालदिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढगाळ हवामानामुळे काकडी उत्पादक हवालदिल
ढगाळ हवामानामुळे काकडी उत्पादक हवालदिल

ढगाळ हवामानामुळे काकडी उत्पादक हवालदिल

sakal_logo
By

किन्हवली, ता. १५ (बातमीदार) : कडाक्याच्या थंडीत ऐन भरात आलेल्या काकडी उत्पादनावर ढगाळ हवामानाचे सावट पसरले आहे. चार-पाच दिवसांपासून थंडी गायब झाल्याने काकडीचे पीक धोक्यात आले असून उत्पादक हवालदिल झाले आहेत. पंधरा दिवसांपासून कडाक्याच्‍या थंडीमुळे काकडी पिकाला अनुकूल वातावरण निर्माण झाले होते; परंतु आता चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे काकडीची वाढ खुंटली असून आकार बदलल्याने मागणीत घट झाली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाले असून, दिवसभर ढगाळ वातावरण आहे. अशा हवामानामुळे रब्बी हंगामही अडचणीत सापडला असून काकडी उत्पादकही हवालदिल झाले आहेत.
-------------------------------
महागाईचा सामना
रब्बी हंगामात शेतीचे काम करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनी नांगरणी, वाकरणी, जमीन सपाटीकरण इत्यादी कामांचे दर वाढवले आहेत. यामुळे खर्चात आता २५ टक्क्यांनी वाढ झाली असून, खत व कीटकनाशकांच्या दरातही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ट्रॅक्टरने नांगरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतितास ६०० रुपये मोजावे लागले होते. यंदा या कामासाठी ७०० ते ८०० रुपये द्यावे लागत आहेत. शेती साहित्याच्या किमतीसह महागाईचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यातच खते, बियाणे, कीटकनाशके यांच्या दरात तिप्पट वाढ झाली असून, परिणामी रब्बी हंगामातील काकडी लागवड खर्चातही मोठी वाढ झाली आहे.
----------------------
शेतकरी चिंताग्रस्त
काकडी आकाराने वाकडी झाल्याने नाईलाजास्तव टाकून द्यावी लागते किंवा गुरांना खायला द्यावी लागते. बुरशीजन्य रोगामुळे पाने पिवळी पडून निस्तेज झाली आहेत. काकडी खुडण्यासाठी येणाऱ्या मजुरांना दिवसाकाठी ३५० रुपये रोख द्यावे लागतात. रात्रंदिवस मेहनत करूनसुद्धा अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
---------------------------------
कोट
सध्या १४ ते १५ रुपये किलोप्रमाणे बाजारभाव असल्याने तो परवडत नाही. किमान २० ते २२ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला तर किमान गुंतवणूक केलेल्या रकमेची तरी वसुली होईल. कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान झालेल्या उत्पादकांना भरपाई देऊन दिलासा द्यावा.
- रमेश गोंधळी, काकडी उत्पादक, शिवाजीनगर, किन्हवली

काकडीवर बुरशीजन्य किंवा अन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास नियमित औषध फवारणी करून घ्यावी. पिकांचा विमा उतरवून घ्यावा.
- अमोल अगवान
तालुका कृषी अधिकारी, शहापूर
---------------------------------
काकडी पिकाच्‍या पानांवर दोन्ही बाजूंनी पांढरी भुकटीच्या स्वरूपातील बुरशी (भुरी रोग) दिसून आल्यास हेक्साकोनाजोल ५ एमएल, १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पानांवर पिवळसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसून आल्यास रोगग्रस्त पाने काढून टाकावी. फळांचा जमिनीशी संपर्क येऊ नये म्हणून फळाखाली आच्‍छादन करावे. फळे जमिनीच्या संपर्कात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
- सारिका शेलार, जिल्हा कृषी अधिकारी, ठाणे