
एचआयव्हीला पायबंद घालण्याचा सामाजिक संस्थाचा विडा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : एचआयव्हीबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्यात एड्सचे प्रमाण घटत आहे. जिल्ह्यात अतिजोखमीच्या गटांमुळे एचआयव्ही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, याला आटोक्यात ठेवण्याचे काम ठाणे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग अंतर्गत ३२ सामाजिक संस्था करताना दिसत आहेत. त्यांच्यामार्फत सुरू असलेल्या जनजागृतीद्वारे जिल्ह्यात एचआयव्हीला पायबंदी घालण्यात काही प्रमाणात यश आले आहे. अतिजोखमी गटातील संख्या हळूहळू नोंदणीतून समोर येताना दिसत आहे.
ठाणे जिल्हा विठ्ठल सायन्ना सामान्य रुग्णालय आणि जिल्हा एड्स कार्यक्रम नियंत्रण विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सेवा-सुविधा केंद्रांमार्फत या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अतिजोखमींच्या गटासोबत काम करणाऱ्या संस्थांमध्ये देहविक्री करून व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांची संख्या ११ आहे. समलिंगी घटकासोबत काम करणाऱ्या दोन संस्था असून शिरेवाटे मादक द्रव्य घेणाऱ्या गटासोबत काम करणारी एक संस्था आहे. याशिवाय तृतीयपंथी गटासोबत काम करणाऱ्या पाच संस्था असून, स्थलांतरित कामगार गटासोबत काम करणाऱ्या ११ संस्था आहेत. याचबरोबर ट्रकचालकांसोबत काम करणाऱ्या दोन संस्था असून एकूण ३२ संस्था कार्यरत आहेत. त्या प्रत्येक संस्थांना दरवर्षी लक्ष्य दिले जाते. आतापर्यंत म्हणजे १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२२ दरम्यान या संस्थांनी त्या-त्या गटाची नोंदणी करत त्यांना या आजारापासून रोखण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.
ठाणे जिल्ह्यात देहविक्री करणाऱ्या महिलांची संख्याही १६ हजार ४२५ असून समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांची संख्या दोन हजार ६१५ असल्याचे समोर आले आहे. मादक द्रव्य घेणाऱ्यांची संख्या ५७ इतकीच आहे. तृतीयपंथीची संख्या दोन हजार ८७५ झाली असून ट्रकचालकांची संख्या ६० हजार आहे; परंतु स्थलांतरित लोकांची संख्या ही दोन लाख ४० एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे.
------------------------------------
विशेष अभियानाद्वारे प्रयत्न सुरू
सामाजिक संस्था या सर्व अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींची वेळोवेळी आरोग्य तपासणी, एचआयव्हीची चाचणी, मोफत औषधोपचार, मोफत निरोध वाटप, वेळोवेळी समुपदेशन, शासकीय संरक्षण योजना मिळवून देणे व इतर रोजगाराभिमुख प्रशिक्षण आयोजित करण्याचे काम करतात. सद्यस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व देहविक्री करणाऱ्या महिला व तृतीयपंथींना मतदान नोंदणी करून लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी विशेष अभियानाद्वारे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती संबंधित विभागाने दिली.
.....................................
कोट :-
ठाणे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागांतर्गत काम करणाऱ्या ३२ हस्तक्षेप प्रकल्प (एनजीओ) कार्यरत असून त्यांच्यामार्फत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक, उपचारात्मक व काळजी, सेवात्मक कामामुळे अतिजोखमीच्या गटातील एचआयव्ही बाधितांची संख्या कमी करण्यात नक्कीच यश आले आहे.
- रतन गाढवे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, ठाणे व पालघर
....................................
अतिजोखमीच्या गटातील एचआयव्ही पॉझिटिव्हीटी कमी झाली असली, तरी पूर्णपणे धोका टळलेला नाही. भविष्यात अतिजोखीम असणाऱ्यांनी व त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी.
- डॉ. कैलास पवार, शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे.
---------------------------------------------
घटक एकूण संख्या कार्यरत संस्था
देहविक्रेत्या १६,४२५ ११
तृतीयपंथी २,८७५ ५
समलिंगी २,६१५ २
मादक द्रव्य घेणारे ५७ १
ट्रकचालक ६० हजार २
स्थलांतरित २ लाख ११
---------------------------