
खाऊच्या पैशांतून आजारी विद्यार्थ्यांला मदत
कासा, ता. १५ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील सावटा येथील के. के. मिस्त्री हायस्कूलचा विद्यार्थी अयान हा मैदानावर कबड्डीचा सराव करीत असताना अचानक खाली पडला. यात त्याच्या डाव्या पायाच्या मांडीच्या हाडाचे फ्रॅक्चर झाले. त्याला लगेचच शिक्षकांनी रुग्णालयात दाखल केले, पण त्याच्या पायाला मार बसल्याने मोठा औषध उपचाराचा खर्च होत आहे, पण त्या मुलाच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने इतर विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे साठवलेले पैसे त्याच्या उपचारासाठी शिक्षकांकडे जमा केले. तसेच शिक्षक वर्गाने देखील वर्गणी काढली आणि १५ हजार ८९० रुपयांचा निधी त्या विद्यार्थ्याच्या वैद्यकीय खर्चाला हातभार लागावा या उद्देशाने कुटुंबाकडे सुपूर्द केला. याबाबत अयानचे वडील कलाम खान यांनी मुख्याध्यापक एस. कापडने, संजय पाटील, एन मोरे यांच्यासह शाळेतील कर्मचारी वर्ग आणि इतर विद्यार्थ्यांचे आभार मानले.