
विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत खर्डीचा डंका
खर्डी, ता. १५ (बातमीदार) : कोकण विभागीय महसूल व सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच मुंबई येथील चेंबूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत पदक मिळवलेल्या सर्व विजेत्यांना ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर व पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी व खर्डीचे मंडळ अधिकारी संदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा कर्मचाऱ्यांनी विविध स्पर्धेत पदक मिळवून शहापूरचा झेंडा फडकवला. तालुक्यातील खर्डी मंडळ कार्यालय अंतर्गत येणाऱ्या शिरोळच्या तलाठी उज्ज्वला दराने यांनी थ्रो बॉलमध्ये सुवर्णपदक, वाशाळाचे कोतवाल दीपाली झुगरे ४०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, दहिगावच्या तलाठी सोनाली हिलम, सामूहिक नृत्यात द्वितीय क्रमांक, आसनगावच्या तलाठी भारती शेट्टी यांना खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक, खर्डीचे कोतवाल यशवंत केवारी यांनी पुरुष गटात चारशे मीटर धावण्यामध्ये तृतीय क्रमांक व दहिवलीचे तलाठी प्रवीण जाधव यांनी खो-खो स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.