प्रोत्साहन निधीपासून शेतकरी वंचित? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रोत्साहन निधीपासून शेतकरी वंचित?
प्रोत्साहन निधीपासून शेतकरी वंचित?

प्रोत्साहन निधीपासून शेतकरी वंचित?

sakal_logo
By

खर्डी, ता. १५ (बातमीदार) : नियमित शेती पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली होती. घोषणा केल्यावर तीन महिने उलटूनही शहापूर तालुक्यांमधील दोन हजारांच्या आसपास शेतकऱ्यांपैकी केवळ ५७८ पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी मिळाला आहे. अद्याप पंधराशे शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महात्मा फुले कृषी शेतकरी प्रोत्साहन सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेतील निधी १५ दिवसांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे जाहीर करण्यात आले होते. दिवाळीच्या दिवसांत प्रोत्साहन योजनेचा ५० हजारांचा निधी उपलब्ध होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पीक हंगामासाठी या निधीचा उपयोग करण्याची तयारी केली होती. तीन महिने उलटूनही प्रोत्साहन योजनेचा निधी बँक खात्यात जमा होत नसल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.

.................................
घोषणा हवेतच राहिल्याने नाराजी
तालुक्यातील शेतकऱ्यांची सध्या वाईट अवस्था असून अगोदरच अवकाळी पावसाने अर्धी भातशेती वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहन निधी घोषित केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडी फोडण्याची आशा निर्माण झाली होती. आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्या निधीचा उपयोग शेतकऱ्यांना होणार होता; परंतु ती घोषणा हवेतच राहिली असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.

----------
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. शिवाय सेवा सोसायट्यांकडून बँकांकडे काही शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यात येणार आहे.
- किरण सोनवणे, जिल्हा सहायक निबंधक, सहकार विभाग, ठाणे

--------
पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन भत्ता जमा न झाल्यास शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
- वसंत पानसरे, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, शहापूर