फेरी बोट बस सेवा अधांतरीच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेरी बोट बस सेवा अधांतरीच!
फेरी बोट बस सेवा अधांतरीच!

फेरी बोट बस सेवा अधांतरीच!

sakal_logo
By

अलिबाग, ता. १५ (बातमीदार) : रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला गती देण्यासाठी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्याबाबत अंमलबजावणी सुरू झाली आहे. येथील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फेरी बोटीतून एसटी बसची वाहतूक करायची की नाही, याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यामार्फत पाहणी केली जाणार आहे. तांत्रिक बाबीची पडताळणी केल्यावरच प्रवासी फेरी बोटीतून बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
अलिबागमधील राजस्व सभागृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीच्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे उपस्थित होते. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री खाडीवरील आंबेत हा पूल दुरवस्थेत आहे. १९७८ मध्ये बांधण्यात आलेला हा पूल दुरुस्तीच्या नावाखाली वाहतुकीसाठी सध्या बंद ठेवण्यात आला आहे. त्याचा परिणाम या दोन्ही जिल्ह्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होत आहे.
आंबेत पुलाच्या कामाला गती मिळत नसल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. या पुलाच्या दुरुस्तीबाबत आम्ही पाठपुरावा केला आहे. याचे कोणीही श्रेय घेऊ नये. संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारांना काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या फेरी बोटीतून एसटी बसची ने-आण करायची की नाही, याबाबत थेट निर्णय घेतला जाणार नाही. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. फेरी बोटीतून एसटी बस सुरू व्हावी, ही भूमिका आहे. मात्र, जोपर्यंत परिवहन विभागाचे अधिकारी, पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडून समाधान होत नाही, तोपर्यंत शहानिशा करणे गरजेचे आहे. तांत्रिक बाबींची पडताळणी करून बस सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
----------------------------
प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार
जनतेचे वैयक्तिक व सार्वजनिक प्रश्न समजून घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अलिबागमधील जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारमध्ये २४९ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १४८ अर्जांची पूर्तता करण्यात आली. प्रलंबित १०८ अर्ज आहेत. महिन्याभरात ९० टक्के प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.