
वाहनचोरी प्रकरणांतील दोन आरोपी अटकेत
मुंबई, ता. १४ : वाहनचोरी प्रकरणांत आरोपी असलेल्या दोघांची मुंबईतील विविध ठिकाणांहून धरपकड करण्यात आली. ३ लाख रुपयांच्या ऑटो रिक्षा चोरीप्रकरणी २८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. समतानगर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या पाच ऑटो रिक्षा जप्त केल्या असून त्यापैकी तीन कांदिवली पूर्व, एक वाकोला आणि एक मालाड येथून चोरीला गेली होती. अर्शद शेख ऊर्फ कल्लू असे आरोपीचे नाव आहे. गोरेगाव येथील अजून एका वेगळ्या प्रकरणात आरे कॉलनी पोलिसांनी मोटारसायकल चोरणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीला अटक केली. मनीष मिश्रा असे आरोपीचे नाव आहे. आरोपी गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलजवळील फूटपाथवर राहत होता. तो संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अडवून तपासणी केली. त्याच्याकडे चार दुचाकीच्या चाव्या सापडल्या. पोलिसांनी त्याच्याकडून १.१७ लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.