महापालिकेला मिळेना पूर्णवेळ शिक्षणाधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेला मिळेना पूर्णवेळ शिक्षणाधिकारी
महापालिकेला मिळेना पूर्णवेळ शिक्षणाधिकारी

महापालिकेला मिळेना पूर्णवेळ शिक्षणाधिकारी

sakal_logo
By

भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाला तब्बल दीड वर्षांनी शिक्षणाधिकारी लाभला आहे, पण तोदेखील अर्धवेळ मिळाला असल्याने अनेक शैक्षणिक कामे खोळंबून राहिली आहेत. शिक्षणाधिकारी कार्यालयातच उपस्थित राहत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सोमवारी आंदोलन केले.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्वत:च्या ३६ शाळा, तसेच शहरातील अन्य खासगी शाळा अशा एकूण दीडशेहून अधिक शाळांचा कारभार महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांभाळला जातो. खासगी प्राथमिक शाळांच्या मान्यता, विद्यार्थ्यांच्या समस्या, महापालिका शाळांचे शैक्षणिक धोरण अशी विविध प्रकारची कामे या विभागाकडून केली जातात. यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून शिक्षणाधिकाऱ्ं‍याची नियुक्ती केली जाते, पण गेल्या दीड वर्षात शिक्षणाधिकाऱ्‍यांची नियुक्तीच करण्यात आली नसल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्‍यांनाच शिक्षण विभागाचा गाडा हाकावा लागत होता.
महापालिकेकडून वारंवार पूर्णवेळ शिक्षणाधिकारी देण्याची मागणी करण्यात आली असतानाही शिक्षण विभागाकडून नुकतीच अर्धवेळ शिक्षणाधिकाऱ्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत काम करणाऱ्‍या शिक्षण विभागाच्या निरीक्षकाला तात्पुरती पदोन्नती देऊन मिरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाचा शिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. परिणामी हे शिक्षणाधिकारी आठवड्यातून एक-दोन दिवसच कार्यालयात येतात. त्यामुळे शाळांच्या अनेक समस्या, शैक्षणिक कामे खोळंबून राहिली आहेत. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष रॉबर्ट डिसोझा यांनी सोमवारी आंदोलन केले.

कार्यालयात बसण्यासाठी दिली खुर्ची
शिक्षणाधिकाऱ्‍यांशी संपर्क केल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात बसण्यासाठी जागा नसल्यामुळे कार्यालयात येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे, अशी माहिती डिसोझा यांनी दिली. त्यामुळे डिसोझा यांनी शिक्षणाधिकाऱ्‍यांना कार्यालयात बसण्यासाठी खुर्ची देऊन अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित असून खासगी शाळांच्या मुजोरीसंदर्भातील अनेक तक्रारी येत आहेत, त्यामुळे सरकारने पूर्णवेळ शिक्षणाधिकारी द्यावा, अशी मागणी डिसोझा यांनी यावेळी केली.

स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता शिक्षणाधिकारी आठवड्यातून एक ते दोन दिवस कार्यालयात उपस्थित राहतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षण विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी द्यावा, अशी मागणी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.