मुंबई, दिल्ली विमानतळावर निमलष्करी दलाचे जवान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई, दिल्ली विमानतळावर निमलष्करी दलाचे जवान
मुंबई, दिल्ली विमानतळावर निमलष्करी दलाचे जवान

मुंबई, दिल्ली विमानतळावर निमलष्करी दलाचे जवान

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १५ : मुंबई, दिल्लीसह देशातील महत्त्वाच्या विमानतळावर प्रवाशांच्या उसळलेल्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी अतिरिक्त निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्याबरोबरच इमिग्रेशन आणि सुरक्षा चेक काऊंटर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळांवरील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नागरी उड्डाण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गेल्या आठवडाभरापासून दिल्ली, मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या गर्दीत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गर्दीमुळे नियोजन फिस्कटल्याच्या शेकडो तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. याची दखल घेत गर्दीवर केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तिन्ही टर्मिनलवर राष्ट्रीय औद्यौगिक सुरक्षा बलाच्या १४०० अतिरिक्त जवानांना तैनात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासोबत विमानतळावर प्रवेश गेट, लगेज चेकिंग आणि सुरक्षा तपासणीला लागणारा उशीर आदीसंबंधीच्या प्रवाशांच्या तक्रारींवर चर्चा झाली.

या आहेत उपाययोजना
- मुंबई, दिल्ली विमानतळावर १०० अतिरिक्त निमलष्करी दलाचे जवान तैनात
- विमानतळावर कॅबिन लगेज संदर्भातील सूचनांचे पोस्टर्स लावणार
- विमानतळ गाठण्यापूर्वीच वेब चेकिंग करण्याचे आवाहन
- चेक इन आणि बॅगेज ड्रॉप सेंटरमध्ये पुरेसे मनुष्यबळ ठेवणार
- विमानांच्या वेळापत्रकासंदर्भात समाजमाध्यमावर माहिती देणार