
गरजूंना साह्य करण्याच्या भारताच्या उद्दिष्टांना पाठिंबा
मुंबई, ता. १५ ः जी-२० कृतिगटाच्या बैठकीसमोर भारताने ठेवलेल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांच्या प्राधान्यक्रमांना सर्व जगाने पाठिंबा दिला आहे. जगातील सर्वांत गरजू व्यक्तींना साह्य करण्यासाठी भारताने राबवलेले कार्यक्रम, डिजिटायझेशन आदींचे अनुकरण जगात कसे करता येईल, यावरही भर दिल्याचे आज सांगण्यात आले.
गेले तीन दिवस मुंबईत सुरू असलेल्या जी-२० कृतिगटाच्या बैठकांमधील मुख्य चर्चा व निष्कर्षांची माहिती आज भारताचे प्रतिनिधी नागराज नायडू आणि श्रीमती एनाम गंभीर यांनी दिली. पर्यावरण संरक्षण आणि विकास हे दोन्ही मुद्दे एकत्रच राबवले पाहिजेत. प्रदूषणमुक्तीसाठी मार्ग व उपाय भारत पुरवेल, यावरही बैठकांमध्ये भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
२००८ च्या अमेरिकी सब प्राईम पेचप्रसंगातून जी-२० गटानेच जगाला बाहेर काढले होते. आताही कोरोनानंतर जग खुले होत असले, तरी मंदीची भीती आहेच. यावर भारत किंवा जी-२० गट उपाय सुचवू शकतो का, या मुद्द्यावर तसेच जगात सर्वांचाच विकास व्हावा, यासाठी भारताने ठरवलेल्या प्राधान्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. यावर आणखी सखोल चर्चेअंती निश्चित आराखडा ठरेल, असेही आज सांगण्यात आले.
...
आधार, जनधनचे अनुकरण
भारताने ज्याप्रमाणे आधार, जनधन योजना अशा प्रकारे माहितीचा योग्य वापर करून जनतेचे हित साधले, त्याचे अनुकरण जगात करता येईल. यूपीआय पेमेंट पद्धतीमार्फत आपण वेगवान पेमेंट करण्याची अद्वितीय यंत्रणा तयार केली आहे. ही उदाहरणे जगात राबवण्यासाठीही चर्चा करण्यात आली. तसेच महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकास करण्यावर भर देऊन साऱ्या जगाचा विकास हे अंतिम ध्येय ठरवण्याच्या दृष्टीने कार्यकारी गटांमध्ये चर्चा झाली, असेही सांगण्यात आले.