
३५ वर्षानंतर भेटलेल्या मैत्रिणीवर अत्याचार
अंधेरी, ता. १६ (बातमीदार) : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मैत्रीला कलंक लावणारी घटना उघडकीस आली आहे. पेशाने रिक्षाचालक असणाऱ्या आरोपीने तब्बल ३५ वर्षांनंतर भेटलेल्या बालमैत्रिणीवर अत्याचार केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात रविवारी (ता. ११) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला सोमवारी (ता. १२) अटक करण्यात आली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता थोपटे यांच्या माहितीनुसार, ५१ वर्षांची पीडित महिला तिच्या दोन मुलांसोबत गोरेगाव परिसरात राहते. बालपणीचा मित्र असणाऱ्या संतोष महाडिक (वय ५१) याच्याबरोबरचा संपर्क विवाहानंतर तुटला होता. तिच्या पतीचे निधन झाल्यावर ती पुन्हा गोरेगावमध्ये राहण्यास आली होती. या वेळी संतोष आणि पीडितेची पुन्हा ओळख झाली. याच मैत्रीचा फायदा घेत संतोषने तिच्याशी पुन्हा जवळीक साधली. तिला आधार देण्याचा प्रयत्न केल्याने दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. दोघेही फिरायला गेल्याचे आणि शारीरिक संबंध असतानाचे त्याने फोटो काढले होते. महिलेने त्याला फोटो डिलीट करण्यास सांगितले असता त्याने नकार दिला. पीडितेच्या एका मित्राला त्याने फोटो दाखवल्याने त्यांच्यातील संबंधाची माहिती मिळाली. याचा जाब विचारला असता संतोषने तिला शिवीगाळ करत धमकी दिली. या प्रकरणी तिने गोरेगाव पोलिसांत लैंगिक अत्याचार, शिवीगाळ आणि धमकीबाबत तक्रार दाखल केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.