किरकोळ वादातून मोखाड्यात एकाची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किरकोळ वादातून मोखाड्यात एकाची हत्या
किरकोळ वादातून मोखाड्यात एकाची हत्या

किरकोळ वादातून मोखाड्यात एकाची हत्या

sakal_logo
By

मोखाडा, ता. १६ (बातमीदार) : मोखाड्यातील पळसुंडे येथील बळवंत शंकर गारे (वय ५८) यांची त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या योगेश गंगाधर पाटील यांच्यात तुरीच्या शेंगांवरून किरकोळ वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून योगेशने आपल्या मित्राच्या मदतीने बळवंतची दगडाने ठेचून हत्या केली. मृत बळवंत यांच्या पत्नी कमल गारे यांच्या फिर्यादीवरून मोखाडा पोलिसांनी आरोपी योगेश पाटील आणि त्याचा मित्र साईदेव शिंगाडे या दोघांना अटक केली आहे.

मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बळवंत गारे हे पळसुंडे येथील सरकारी आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून कामाला होते. पळसुंडे गावात त्यांच्या घरासमोरच योगेश गंगाधर पाटील राहत होता. या दोघांमध्ये ६ डिसेंबरला तुरीच्या शेंगांवरून किरकोळ वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून योगेशने आपला मित्र साईदेव शिंगाडे याच्या मदतीने बळवंतला १२ डिसेंबरला गावाबाहेर नेले. तेथे बळवंतचे डोके दगडाने ठेचून त्याचा खून केला. त्यानंतर बळवंतचा मृतदेह या दोघांनी पळसुंडेजवळील निकमवाडी येथे फेकून दिला. दोन दिवस बळवंत घरी आला नसल्याने त्याचा शोध घेत असता बळवंतचा भाऊ अनंता गारेला त्याचा मृतदेह निकमवाडीजवळ आढळून आला. मृत बळवंतची पत्नी कमल गारेच्या फिर्यादीवरून स्थानिक गुन्हे शाखा पालघर व मोखाडा पोलिसांनी तपास करून दोन दिवसांत आरोपी योगेश पाटील व साईदेव शिंगाडे यांना अटक केली आहे. त्यांना जव्हारच्या प्रथम वर्ग न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे करत आहेत.