
तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : उपनगरीय रेल्वे मार्गांवर रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत तांत्रिक कामे करण्यासाठी रविवार, १८ डिसेंबर २०२२ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप-डाऊन धीमा; तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरही वसई रोड ते भाईंदरदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे - माटुंगा ते मुलुंड अप-डाऊन धीमा मार्ग
कधी - सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत
परिणाम - ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील; तर ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील उपनगरीय लोकल मुलुंडपासून अप जलद मार्गावर वळवल्या जातील. त्यानंतर माटुंगा येथे अप धीम्या मार्गावरून धावतील.
हार्बर रेल्वे
कुठे - पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्ग
कधी - सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत
परिणाम - ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाण्याकडे जाणारी अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवाही रद्द राहील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान, विशेष लोकल चालविण्यात येतील. तसेच ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकादरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असेल.
पश्चिम रेल्वे
कुठे - वसई रोड ते भाईंदर अप-डाऊन जलद मार्ग
कधी - शनिवार रात्री ११.३० ते रविवार पहाटे ५.१५ पर्यंत
परिणाम - ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील सर्व उपनगरीय लोकल सेवा वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तसेच या ब्लॉक कालावधीत अप-डाऊन दिशेच्या काही उपनगरीय लोकल सेवा रद्द राहणार आहेत.