
आंदोलनातून नागरिकांना विचलित करण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : भायखळा ते सीएसटी दरम्यानच्या हल्लाबोल मोर्चाच्या भीतीने महाराष्ट्र पेटून उठेल, अशी भीती असल्यानेच भाजपने ठिकठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. भाजपला मोर्चाची भीती वाटत आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच आंदोलनाचा प्रकार करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील खदखद व्यक्त होत मोर्चा यशस्वी होण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होतील, असा विश्वास शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी व्यक्त केला.
मुंबई पोलिस उपायुक्तांसोबत मोर्चाच्या निमित्ताने केलेल्या चर्चेत गाड्यांचे पार्किंग, स्टेजची जागा कुठे आणि कशी असेल, अशा अनेक मुद्द्यांवर अनिल परब यांची आज (ता. १६) सायंकाळी चर्चा झाली. शिवसेनेच्या ताकदीनुसार शेवटच्या क्षणालाही व्यासपीठ उभे करण्याची आमची क्षमता आहे. व्यासपीठ अतिशय भव्य-दिव्य असेल. उद्या लोकांच्या मनात कोणाविरोधात खदखद आहे, हेदेखील त्यानिमित्ताने समोर येईल. लोकशाहीत व्यक्त होण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठीही भाजपची गरज लागत असेल, तर राजकीय पक्ष म्हणून आम्हाला विचार करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक मतदारसंघांमध्ये जनजागृती
मोर्चासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, यासाठी शिवसेनेच्या वतीने प्रत्येक मतदारसंघांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मोर्चात का सहभागी व्हायला हवे, याची माहिती देणाऱ्या गाड्या ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. सरकारला जाग आणण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.