
दत्त मंदिरातून चांदीच्या पत्र्याची चोरी
रेवदंडा, ता. १६ (बातमीदार) : रेवदंडा येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौल-भोवाळे पर्वतवासी दत्तमंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या नक्षीकाम केलेल्या सुमारे ४० किलो वजनाच्या पत्र्याची चोरी झाल्याची घटना घडली. या चोरीच्या प्रकरणाने अलिबाग तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्रीच्या वेळात अनोळखी चोरट्यांनी मंदिराच्या बंद गाभाऱ्यात प्रवेश करून ४० किलो चांदीचा नक्षीकाम असलेला चोवीस लाख रुपयांचा पत्रा चोरीस गेला आहे. याबाबत मंदिराचे पुजारी प्रभाकर आगलावे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनास्थळाला पोलिस उपअधीक्षक जगदीश काकडे यांनी भेट दिली असून सायबर क्राईम, फिंगरप्रिंट, डॉक स्कॉट हे घटनास्थळी आले असून पुढील तपास काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देवीदास मुपडे करीत आहेत. दरम्यान, ही बातमी पसरताच परिसरात मागील काही वर्षांपूर्वी दिवेआगर (श्रीवर्धन) मधील सुवर्ण गणेशमूर्तीची चोरी झाल्याची आठवणच अनेकांना झाली.