
ग्रामीण उद्योजकतेने विषमता कमी होईल
मुंबई, ता. १८ : देशात सुबत्ता वाढत आहे, तशी श्रीमंत आणि गरीब यांच्यातील विषमताही वाढत आहे. ग्रामीण भागात उद्योजकता वाढली, तर हा प्रश्न सुटायला हातभार लागेल, अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्स्चेंज अवार्डच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी १६ गटात बहुतांश महिला उद्योगिनींना (एका उद्योजकासह) विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ उद्योजक दीपक घैसास उपस्थित होते.
ग्रामीण उद्योजकतेची अनेक वैशिष्ट्ये आणि फायदे काकोडकर यांनी सांगितले. स्वयंसहाय्य गटांची कर्जे कधीही बुडत नाहीत. उद्योजकता वाढणे, ही काळाची गरज आहे. उद्योजकतेमुळेच सामाजिक संपत्ती निर्माण होईल. उद्योजकता आणि नैतिक वागणे हे आपण ग्रामीण भागातच बघितल्याचे अनुभवही त्यांनी सांगितले. सर्वांचे सक्षमीकरण पण कोणाचेच शोषण नाही, अशी व्यवस्था होणे गरजेचे आहे. आज समाजात सुबत्तेबरोबर दिसणारी विषमता कशी कमी होईल, याचे उत्तर मला मिळाले नाही; पण ग्रामीण भागात सुबत्ता आली तर ही दरी बुजेल, असा आशावादही काकोडकर यांनी व्यक्त केला.
तर घैसास यांनी उद्योजकतेबद्दल काही टिप्स दिल्या. उद्योग करताना नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकतेवर भर द्यावा. कारण भीतीचे रूपांतर संधीत कसे करावे, हे ज्याला जमले त्याला उद्योग जमला. उद्योग करायला शिक्षण लागत नाही; पण शहाणपण आणि माहिती लागते. माहितीचे रूपांतर संपत्तीत करणे महत्त्वाचे आहे. कोरोना साथीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे ते आता व्यवसायात चांगले रमले आहेत, असे उदाहरणही त्यांनी दिले.
देशभरातून पाचशे अर्ज
मृणाल सराफ, सोनाली कोचरेकर, धनश्री पाठक, विनिता शिरोडकर, सायली भिडे, प्रसाद सावंत, शिमुल भट, रेखा बोरकर, मृणाली चव्हाण, मधुरा पाटणकर, सीमा महाजन, स्वप्नाली मटकर, योगिता कुलकर्णी, उज्वला गोसावी, ऋता पंडित यांना वैयक्तिकरीत्या; तर जयश्री यादव व अपर्णा कुलकर्णी यांना संयुक्त पुरस्कार मिळाला. यावेळी देशभरातून या पुरस्कारांसाठी पाचशे अर्ज आले. त्यातून दृकश्राव्य माध्यमाद्वारे मुलाखती घेऊन, त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन ज्युरींच्या साह्याने अंतिम विजेते निवडण्यात आले, असे आम्ही उद्योगिनीच्या मीनल मोहाडीकर यांनी सांगितले.
उद्योगांत स्वतःशी स्पर्धा
आपण सर्वजण पैशांसाठीच उद्योग करतो, पण नीतिमत्ता महत्त्वाची असून ते सांभाळूनच पैसा मिळवावा. ज्ञानावर आधारित उद्योग करता येत असेल तर जरूर करावा. उद्योजक श्रीमंत होत नाहीत, तोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही. उद्योगात संथ माणसे जिंकत नाही, त्यासाठी वेगाने पळावे लागते. यात इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा करून इतरांना सहाय्य करावे व दोघांनीही पुढे जावे हे महत्त्वाचे आहे, असे दीपक घैसास म्हणाले.