लज्‍जतदार मिसळवर वसईकरांचा ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लज्‍जतदार मिसळवर वसईकरांचा ताव
लज्‍जतदार मिसळवर वसईकरांचा ताव

लज्‍जतदार मिसळवर वसईकरांचा ताव

sakal_logo
By

वसई, ता. १८ (बातमीदार) : मिसळ खाण्याचा आनंद काही औरच... झणझणीत, तिखट तर्री असलेल्या नानाविध प्रकारच्‍या मिसळींना खवय्या वर्गाची नेहमीच पसंती मिळते. वसईकरांची नेमकी हीच गरज ओळखून त्‍यांच्‍या जिभेचे चोचले पुरविण्‍यासाठी राज्‍याच्‍या कानाकोपऱ्यातून मिसळ विक्रेते शहरात दाखल झालेत. निमित्त आहे ते मिसळ महोत्सवाचे. या ठिकाणी नागरिकांची झुंबड उडाली असून, ऐन थंडीच्‍या हुडहुडीत आयोजित केलेल्‍या महोत्‍सवामुळे मिसळीची लज्‍जत अधिकच वाढली आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध मिसळीची आस्वाद घेण्याची संधी शिवसेना वसईच्या माध्यमातून आयोजक मिलिंद चव्हाण यांनी पार्वती सिनेमा मैदान, अंबाडी रोड, वसई पश्चिम येथे नागरिकांना उपलब्‍ध करून दिली आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन जागतिक कीर्तीच्या गिर्यारोहक वसईकन्या हर्षाली वर्तक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम, शिवसेना जिल्हा सचिव विवेक पाटील, जगदीश कदम, साधना धुरी, माजी नगरसेवक छोटू आनंद, मिलिंद चव्हाण उपस्थित होते.
खवय्यांना बंबातली मिसळ, माठातली मिसळ, पुणे कोल्हापूरची झकास मिसळ, विठू माऊली, झटकेदार मिसळ, नाशिकची मूग मटकी मिसळ, दांडगा पैलवान कट वडा अशा विविध चवीच्‍या मिसळ नागरिकांना येथे मिळतात. तिखट मिसळ खाल्‍ल्‍यानंतर नागरिकांची पावले मॉकटेल्स, गोड पान, खरवस, बर्फाचा गोळा, फ्रूट सलाड याकडे वळतात.
---------------
पुणेरी पाट्यांचे आकर्षण
पुणे कुठे काय करेल याचा पत्ता लागणार नाही, असे गमतीने म्हटले जाते; मात्र वसईकरांना आता त्याचा प्रत्यय येतोय. मिसळ विक्रेत्यांच्‍या पुणेरी पाट्या आकर्षण निर्माण करत आहेत.
--------------------
कडधान्य व पौष्‍टिकता
कडधान्य खाण्याने जीवनसत्त्व मिळते. वातूळपणा कमी होतो, पचायला चांगली असतात. कडधान्यात क जीवनसत्त्व हे दोन ते सहा मिलिग्रॅम असते. यासह विविध फायदे दर्शविणारे फलक कडधान्य मिसळ तयार करणाऱ्या मावळ मिसळ दुकानावर लावण्यात आले आहेत.
--------------------
आम्ही या मिसळ महोत्सवात पुण्याहून आलो आहोत. वसईत नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिखट मिसळ सोबत पौष्‍टिक खाद्य देण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यानुसार दही, काकडी, टोमॅटो, कडधान्य आदींचा समावेशदेखील असतो.
- अभिषेक देशमुख, विक्रेते, पुणे
---------------------
वसईत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मिसळविक्रेते आले आहेत; त्यामुळे आपले गाव सोडून कामानिमित्त आलेल्या वसईतील नागरिकांना त्यांच्या गावातील प्रसिद्ध मिसळचा आस्वाद घेता येत आहे.
- मिलिंद चव्हाण, महोत्‍सव आयोजक