बसस्‍थानकाच्या दैनावस्‍थेमुळे प्रवासी त्रस्‍त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बसस्‍थानकाच्या दैनावस्‍थेमुळे प्रवासी त्रस्‍त
बसस्‍थानकाच्या दैनावस्‍थेमुळे प्रवासी त्रस्‍त

बसस्‍थानकाच्या दैनावस्‍थेमुळे प्रवासी त्रस्‍त

sakal_logo
By

कृष्‍णा भोसले ः सकाळ वृत्तसेवा
तळा, ता. १८ ः तालुक्यातील ६५ गावांना जोडणाऱ्या एसटीसह बसस्‍थानकाचीही दुर्दशा झाली आहे. अपुऱ्या जागेमुळे बस वळवताना अडचणी येतात. लगतच रहिवाशी वस्‍ती असल्‍याने अनेक जण बसस्‍थानकात खासगी गाड्या उभ्‍या करतात. त्‍यामुळे प्रवाशांची पुरती गैरसोय होते.
बसस्‍थानकात ठिकठिकाणी खड्डे पडल्‍याने बसमध्ये चढताना-उतरताना प्रवाशांना कसरत करावी लागते. काही ठिकाणी कातळाचे मोठमोठे उंचवटे आहेत. त्‍यात अपुरी जागा असल्‍याने गाडी चालवताना, वळवताना चालकांची दमछाक होते. मध्यंतरी एसटी स्‍थानकातील संरक्षण भिंत तुटल्‍याने मच्छी विक्रेती महिला जखमी झाली होती. मात्र तेव्हापासून भिंतीची डागडुजी झालेली नाही. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांना विकतच्या पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. बसस्‍थानकात आसनव्यवस्‍था, पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्‍था करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून वारंवार केली जात आहे, मात्र त्‍याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

बसस्‍थानकात फेऱ्या
- तळा बसस्थानकात माणगाव आगाराच्या तीन गाड्या असून त्‍यांच्या १९ फेऱ्या दररोज होतात.
- रोहा आगारातील ४ ते ५ गाड्या धावत असून ५५ फेऱ्या होतात.
- श्रीवर्धन आगारातून चार बस, तर मुरूड आगारातील बसच्या चार फेऱ्या तळा बसस्‍थानकातून होतात.
- लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सकाळी वाशी-मुंबई सकाळी ६.२५, तळा-रोहा-पनवेल १०.३० वाजता सुटते.
- तळेगाव-तळा-मुंबई बस दुपारी अडीचदरम्‍यान, तळा-बोरिवली दुपारी ३.३० वाजता चार गाड्या धावतात.

दररोज जवळपास २००० प्रवाशांची वर्दळ
तालुक्‍यासह ग्रामीण भागातील जवळपास ४०० विद्यार्थी दररोज एसटीने प्रवास करतात, तर कामानिमित्त येणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची संख्या दीड हजाराच्या घरात आहे. बसस्‍थानकातील आसन व्यवस्‍थाही मोडकळीस आल्‍याने प्रवाशांची गैरसोय होते.

तळा बसस्थानकात पाणपोई नाही. काँक्रिटीकरणाचा विषय हा रोहा आगाराच्या अधिन आहे. याबाबत वरिष्‍ठांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
- प्रशांत माडुंस्कर, विभाग नियंत्रक, तळा

तळा बसस्थानकात जागा अपुरी आहे. त्यातच ठिकठिकाणी खड्डे पडल्‍याने अपघाताची शक्‍यता आहे. बस प्रवाशांच्या सोयीसाठी स्‍थानकात लवकरात लवकर काँक्रिटीकरणाची गरज आहे. त्‍याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची सोय होणे गरजेचे आहे.
- दिलीप जाधव, प्रवासी