संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

निवृत्तिवेतनाची रक्कम १३ वर्षांनी
पुनर्स्थापित करण्याची मागणी
मुंबई, ता. १८ (बातमीदार) ः आपल्या निवृत्तिवेतनाचा भाग अंशराशीकृत केलेला असलेल्या महापालिका आणि राज्य शासकीय सेवानिवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या निवृत्तीस १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अंशराशीकरणाच्या देय असलेल्या भागाची रक्कम पुन्हा स्थापित करण्याची तरतूद बदलावी. १५ ऐवजी १३ वर्षांनी अंशराशीकृत भागाची देय रक्कम पुनर्स्थापित करावी, अशी मागणी महापालिका शिक्षक सेना तसेच बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशनने एका निवेदनाद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
गुजरात शासनाने त्यांच्या निवृत्तिवेतनधारकांना १५ वर्षांऐवजी १३ वर्षांनी अंशराशीकरणाची रक्कम पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारनेही तसाच निर्णय घेऊन शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियम आठ अ (एक) (ए) नुसार ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्या निवृत्तिवेतनाचा भाग अंशराशीकृत केलेला आहे त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीस १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अंश राशीकरणाच्या देय भागाची रक्कम पूर्ण स्थापित करण्याची तरतूद आहे. शासनाने नियमात योग्य ती दुरुस्ती विनाविलंब करून राज्यभरातील लाखो सेवानिवृत्तांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी संघटनांनी केली आहे.

‘स्वच्छ मुंबई’ अभियानांतर्गत
सायनमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती
वडाळा, ता. १८ (बातमीदार) ः मुंबई महापालिका आणि राज्य शासनाच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या ‘माझी मुंबई स्वच्छ मुंबई’ अभियनांतर्गत स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी रविवारी (ता. १८) समाजसेवक अशोक कुर्मी यांच्यातर्फे सायनमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. सायन पोलिस अधिकारी वर्ग, महापालिका एफ नॉर्थ विभाग अधिकारी व कर्मचारी यांच्यासमवेत सायन धारावी स्पोर्ट्स असोसिएशन यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नागरिकांमध्ये जनजागृती केली. सायन तलाव, सायन फिश मार्केट, एचपी पेट्रोल पंप, सुंदरम शूज, पीव्हीआर सिनेमा, हॉटेल पेनिन्सुला, आदिजंता सोसायटी, सांग्रिला गेस्ट हाउस, जोगळेकर वाडी शाळा व सायन किल्लादरम्यान प्रभात फेरी काढण्यात आली. आपल्या सर्वांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या पिंपळाच्या पानांचे महत्त्व जनजागृतीच्या माध्यमातून सर्वांना समजवण्यात आले. पिंपळाच्या पानावर स्वच्छतेबाबतचे प्रबोधनात्मक संदेश लिहून सहभागी स्वयंसेवकांनी जनजागृती केली. प्लास्टिकचा वापर टाळा, असेही आवाहन प्रभात फेरीदरम्यान करण्यात आले. सहभागी बच्चेकंपनीना नाताळच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस टोपीचे वितरण करण्यात आले.

चेंबूरमध्ये ऑर्केस्ट्रा बारवर छापा
चेंबूर, ता. १८ (बातमीदार) ः चेंबूरमधील आरसी मार्गावर असलेल्या ज्योती पंजाब बार आणि रेस्टॉरंटवर अंमलबजावणी एसएस शाखेने छापा टाकून एकूण १६ आरोपींना अटक केली. शनिवारी (ता. १७) मध्यरात्री ऑर्केस्ट्रा बारमध्ये बेकायदा प्रकार सुरू असल्याची माहिती एसएस शाखेला मिळाली होती. त्याआधारे छापा टाकण्यात आला. कारवाईसाठी चेंबूर पोलिस ठाण्याची मदत घेण्यात आली. बारमधील आठ पीडित मुलींची सुटका करण्यात आली. ९४ हजारांच्या मुद्देमालासह एकूण १७ आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. पुढील तपास चेंबूर पोलिसांकडे सोपविला असल्याची माहिती मुंबई पोलिस अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी दिली.

पाचशे ख्रिसमस ट्रीचे वाटप करून
पोप फ्रान्सिस यांचा जन्मदिन साजरा
मालाड, ता. १८ (बातमीदार) ः ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च गुरू पोप फ्रान्सिस यांच्या जन्मदिनानिमित्ताने बॉम्बे कॅथलिक सभेत ख्रिसमस ट्रीचे वाटप करण्यात आले. १७ डिसेंबर रोजी पोप फ्रान्सिस यांचा जन्मदिन बॉम्बे कॅथलिक सभेचे उपाध्यक्ष बेंटो लोबो यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त मुंबईतील अनेक चर्चमध्ये पाचशे ख्रिसमस ट्रीचे वाटप करण्यात आले. पुढील दोन वर्षांत विविध चर्च आणि सोसायट्यांमध्ये त्यांचे रोपण करून त्यांना जगवण्याची जवाबदारी विविध नागरिकांवर सोपवण्यात आली आहे. पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ डॉ. नील अबेरो, चिकित्सक, माजी चेअरमन अवर लेडी ऑफ व्हिक्टोरिएस व इतर मान्यवर तसेच बीसीएसचे पदाधिकारी सदस्य या वेळी उपस्थित होते. त्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची माहिती बीसीएस अध्यक्ष डॉल्फी डिसोझा यांनी दिली. पर्यावरण जतन करण्याच्या उद्देशाने ख्रिसमस ट्रीचे वाटप आणि त्यांचे रोपण करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्षात कृती करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.