वीट व्यवसायाला ‘अवकाळी’ फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीट व्यवसायाला ‘अवकाळी’ फटका
वीट व्यवसायाला ‘अवकाळी’ फटका

वीट व्यवसायाला ‘अवकाळी’ फटका

sakal_logo
By

महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. १८ : पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून असलेले ढगाळ वातावरण, त्यात अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाचा वीटभट्टी व्यवसायाला फटका बसला आहे. आधीच उशिरापर्यंत लांबलेल्या पावसामुळे विटांचा व्यवसाय सुरू होण्यास बिलंब झाला. यातून वीट व्यावसायिक सावरत असतनाच अवकाळी पावसामुळे वीटभट्टी चालक पुन्हा चिंतेत सापडले आहेत. या पावसामुळे कच्च्या विटांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या कच्च्या विटांचे नुकसान होऊ नये यासाठी वीटभट्टी चालक प्लास्टिकच्या ताडपत्रीचा आधार घेत आहेत.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक वीटभट्टीचे उद्योग आहेत. वीटभट्टी उद्योग हे प्रामुख्याने डहाणू ग्रामीण भागातील महालक्ष्मी, रानशेत, पेठ, तवा, वरोती, तलवाडा, गंजाड, धनिवरी, सायवन येथे मोठ्या प्रमाणात केला जातो. या वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत भात कापणीची कामे सुरू होती. त्यामुळे दर वर्षी दिवाळीपासून सुरू होणारा विटांच्या निर्मितीचा उद्योग यंदा उशिराने सुरू झाला. अशात लांबलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा असल्याने सुरुवातीच्या काळात उत्पादनात घट झाली होती. यातून वीट व्यावसायिक सावरत नाही तोच अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसामुळे कच्च्या विटांचे नुकसान झाल्याचे वीट व्यावसायिकांनी सांगितले.
यंदाच्या मोसमात वीट व्यवसायाला डिसेंबर महिन्यात सुरुवात झाली. या व्यवसायासाठी चांगल्या प्रतीची माती, राख, तूस, दगडी कोळसा यासह इतर साहित्याची जमवाजमव अनेकांनी वीट व्यावसायिकांनी केली होती.
..
अस्तित्वासाठी संघर्ष
कोरोनाच्या काळात अनेक वीट व्यवसाय बंद झाले. त्यात सध्या राखेपासून तसेच मशीनच्या साह्याने विटा बनविल्या जात असल्याने पारंपरिक हाताने बनविल्या जाणारा वीट व्यवसाय अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. अशात वीट बनविण्यास लागणारे साहित्य महाग झाले असून हाताने विटा बनविणारे कारागीरसुद्धा दुर्मिळ झाले आहेत. तसेच हातापासून तयार केल्या जाणाऱ्या विटांची किंमत जास्त असल्याने त्यांची मागणीही कमी झाली आहे, असे पारंपरिक वीट व्यावसायिकांनी सांगितले.
.....
वीट बनविणारे कारागीर मिळणे कठीण झाले आहेत. तसेच वीट बनवण्याच्या साहित्याच्या किमती वाढल्या असून मागणीतही मोठी घट झाली आहे. अशा सर्व संटकांना तोंड देत व्यवसाय करत असताना अवकाळी पावसाचा फटका बसला असून यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
- संतोष देशमुख, वीट व्यावसायिक
....
आता मेहनतीची कामे कोणी करावयास धजावत नाही. शहरात कामासाठी गेल्यास चारशे ते सहाशे रुपये मजुरी मिळते, त्यामुळे कोणी वीट करण्याच्या कामाला येत नाही. तरीही आम्ही अनेक वर्षांपासून हे काम करीत आहोत. आम्ही नवरा-बायको दोघे हे काम करून आमचा उदरनिर्वाह करीत आहोत.
- शिवराम हाडल, वीट कामगार