
जंजिरे वसई किल्ल्यात नरवीर चिमाजी आप्पांना मांवनदना
विरार, ता. १८ (बातमीदार) : जंजिरे वसई किल्ल्याच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या किल्ले वसई मोहीम परिवारातर्फे नरवीर चिमाजी (चिमणाजी) आप्पा पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना मानवंदना शनिवारी जंजिरे वसई किल्ल्यात अर्पण करण्यात आली. वसई किल्ल्यातील चिमाजी आप्पा स्मारकात मोडी लिपी पत्रे, दीपपूजन, स्मारकपूजन, कलशपूजन, शस्त्र मानवंदना, वास्तूदेवता पूजन, पुण्य अभिषेक असे अनेक उपक्रम पार पडले.
दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे शनिवारवाडा, श्री ओंकारेश्वर मंदिर, नागेश महातीर्थ, निर्मळ, दांडाळे तलाव इत्यादी तीर्थक्षेत्रांतून आणलेल्या जलाने नरवीर चिमाजी आप्पांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. त्यानंतर नवे भगवे निशाण उभारून मानवंदना देण्यात आली. नरवीर चिमाजी आप्पांच्या सोबत सती गेलेल्या त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई यांच्या नावे यावेळी कलशपूजन करण्यात आले. या उपक्रमाचे औचित्य साधून गोरेगाव येथील सेंट झेव्हियर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जंजिरे वसई किल्ला अभ्यास सफर आयोजित करण्यात आली होती. यात तब्बल १९४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन जंजिरे वसई किल्ल्याचा विविध कालखंडातील इतिहास जाणून घेतला.
इतिहास अभ्यासक व किल्ले वसई मोहीमप्रमुख श्रीदत्त नंदकुमार राऊत यांनी त्यांच्या ५७३ व्या अभ्यास सफरीत शालेय दुर्गमित्रांना ‘नरवीर चिमणाजी आप्पा व जंजिरे वसई किल्ला’ या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी यावेळी नरवीर चिमाजी आप्पा स्मारक, डोमणिकन मठ, टाऊन हॉल, बालेकिल्ला, चक्रीजीना, दर्या दरवाजा इत्यादी वास्तूंना प्रत्यक्षात भेट देऊन इतिहास जाणून घेतला. आजच्या पुण्यतिथी उपक्रमाचे औचित्य साधून उत्तर कोकण मोडी लिपी मंडळ, महाराष्ट्र अंतर्गत आज्ञापत्र उपक्रमात योगदान दिलेल्या विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्रे देऊन सन्मान करण्यात आला.
....
चिमाजी आप्पा यांच्या मृत्यूस २८२ वर्षे पूर्ण
इ.स. १७३९ मध्ये नरवीर चिमाजी आप्पा पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने उत्तर कोकणातील पोर्तुगीज सत्तेचा समूळ पराभव करून विजयश्री मिळवली. युरोपियन सागरी सत्तेविरुद्धच्या संघर्षात भारतीयांनी मिळवलेला पहिला विजय म्हणून वसईच्या रणसंग्रामास फार मोठे महत्त्व आहे. वसईच्या रणसंग्रामात अहोरात्र कष्ट घेणाऱ्या नरवीर चिमाजी आप्पा पेशवे (चिमणाजी आप्पा) यांचे निधन दिनांक १७ डिसेंबर १७४० रोजी ओंकारेश्वर पुणे येथे झाले. या घटनेस यंदा २८२ वर्ष पूर्ण होत आहेत.
-------------------------------
गौरवशाली इतिहास परंपरा व वीरांच्या स्मृतींना मानवंदना उपक्रम येणाऱ्या पिढीला माहिती व्हावे, यासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने योगदान देत आहोत. किल्ले वसई मोहिम परिवारतर्फे यंदाही नरवीर चिमाजी (चिमणाजी) आप्पा पुण्यतिथी निमित्ताने त्यांना मानवंदना अर्पण करण्यात आली.
- श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक व किल्ले वसई मोहीमप्रमुख