
वीर सैनिकांसाठी धावले ठाणेकर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : मातृभूमीच्या संरक्षणासाठी सीमेवर अलौकिक शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ठाणेकर रविवारी धावले. औचित्य होते विजय दिनानिमित्त आयोजित सोल्जरॅथॉन विजय रनचे. रविवारी पहाटे सुरू झालेल्या या विजय रनमध्ये सुमारे दोन हजार ठाणेकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा करून महिला व तरुणांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
१९७१ च्या भारत-पाक युद्धात भारतीय सैन्याने प्राप्त केलेल्या विजयाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १६ डिसेंबर हा दिवस सैनिकांच्या सन्मानार्थ ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण भारतभर १७३ ठिकाणी विजय रन आयोजित करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील हिरानंदानी मेडोज चौकात रविवारी सकाळी ६ ते ८ यावेळेत भारतीय जनता पार्टी ठाणे शहर, नवयुग मित्र मंडळ, ठाणे महापालिका आणि फिटिस्तान-एक फिट भारत यांच्या संयुक्त विद्यमाने सोल्जरॅथॉन-विजय रन आयोजित करण्यात आली होती.
भाजपच्या माजी नगरसेविका स्नेहा आंब्रे, ठाणे भाजपचे उपाध्यक्ष रमेश आंब्रे यांच्या पुढाकाराने व फिटिस्तानचे कॅप्टन अवतारसिंग बिंद्रा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनचे उद्घाटन भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, माजी नगरसेवक मनोहर डुंबरे, कृष्णा पाटील, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, ठाणे शहर उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी, उद्योजक मनोज सिंग आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. या मॅरेथॉनच्या माध्यमातून सुदृढतेचा संदेश देखील देण्यात आला.