भिवंडी पालिकेच्या सिटी पार्कवर कचरा डम्पिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी पालिकेच्या सिटी पार्कवर कचरा डम्पिंग
भिवंडी पालिकेच्या सिटी पार्कवर कचरा डम्पिंग

भिवंडी पालिकेच्या सिटी पार्कवर कचरा डम्पिंग

sakal_logo
By

भिवंडी, ता. १९ (बातमीदार) : महापालिकेच्या सिटी पार्कच्या आरक्षित जागेवर गेल्या काही वर्षांपासून कचरा टाकून डम्पिंग ग्राऊंड बनवले आहे. पालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापनास तिलांजली दिल्याने या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानचे बक्षीस मिळवून स्वतःला बढती मिळवण्याच्या हेतूने वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी सिटीपार्कचा देखावा उभा करतात. नंतर हा पार्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गडप होऊन जातो. अशा घटना वारंवार घडत असून यामधून नागरिकांची आणि सरकारची फसवणूक केली जात आहे.
भिवंडी महापालिका झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त आणि स्वच्छता व आरोग्य अधिकारी यांनी सरकारी निधीमधून नवीन साधने खरेदी करत घनकचरा व्यवस्थापन करण्याच्या हेतूने तालुक्यातील काटई भागातील पालिकेच्या जागेवर डम्पिंग ग्राऊंड सुरू केले; मात्र तेथेदेखील घनकचरा व्यवस्थापन न करता कचऱ्याचे ढीग उभे केल्याने परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी कचरा टाकण्यास हरकत घेतली. त्यानंतर इतर ठिकाणीदेखील हीच परिस्थिती कायम राहिल्याने साईबाबा कल्याण रोड, फेणे गाव अशा विविध खासगी व पालिकेच्या जागेवरील डम्पिंग नागरिकांच्या विरोधाने बंद झाले, पण घनकचरा व्यवस्थापन आणि खत प्रकल्प सुरू झाले नाहीत.
दररोज ४०० मेट्रिक टन कचरा
२०११ मध्‍ये रामनगर चाविंद्रा येथील सर्व्‍हे नंबर ७ पै, १०६ पैमधील एकूण ६.१० हेक्टर जमीन ही सिटी पार्कसाठी विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक ११५ नुसार आरक्षित केलेल्या जागेवर तेथील खोलगट भाग भरण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून कचरा टाकण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या २६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळातील लोकवस्तीमधून दररोज निघणारा सुमारे चारशे मेट्रिक टन कचरा या सिटी पार्कच्या ठिकाणी जमा होत आहे.
----------------------------
परिसरात दुर्गंधीचे साम्राज्‍य
सिटीपार्कच्या जागेवर कचरा टाकला जात असतानाच या परिसरात अतिक्रमणे वाढून सध्या पालिकेकडे ६.१० हेक्टर जागेपैकी ५.७५ हेक्टर क्षेत्र ताब्यात आहे. शहरांतर्गत निघणाऱ्या दररोजच्या कचऱ्याची साठवणूक व प्रक्रिया करण्यासाठी पालिका स्वच्छता आणि आरोग्य विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्च करत असताना या भागातील नागरिकांच्या आरोग्याची समस्या उभी ठाकली आहे. शहरातून निघणारा शेकडो टन कचरा महापालिकेने चाविंद्रा येथील सिटी पार्कचे आरक्षण असलेल्या जागेत टाकून या पार्कचे डम्पिंग ग्राऊंड करून त्या ठिकाणी कचऱ्याचा मोठा खच निर्माण झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
-----------------------
३५ हजार नागरिकांचा जीव टांगणीला
ओला व सुका कचरा विलगीकरण न केल्याने व जंतुनाशके न फवारल्याने विविध आजार पसरून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे; तर डोंगराच्या उंचीने साचलेल्या कचऱ्यास नेहमी आग लागून जळाल्याने परिसरात धूर पसरून या परिसरातील तब्बल ३५ हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. कचरा जाळल्याने निघणाऱ्या विषारी धुरामुळे नागरिकांमध्ये श्वसनाचे आजार बळावले आहेत; तर तेथून निघणाऱ्या केमिकल, दूषित पाण्यामुळे परिसरातील शेतीदेखील नापीक झाली आहे.
--------
चाविंद्रा रामनगर येथील डम्पिंग ग्राऊंडविरोधात स्थानिक नागरिक मागील कित्येक वर्षे आंदोलन करून पालिका प्रशासनाकडे डम्पिंग बंद करण्याची मागणी करीत आहेत. डम्पिंग ग्राऊंड कायमस्वरूपी बंद करण्यासाठी लवकरच स्थानिक सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून येथील डम्पिंग कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
- अनंत पाटील, काँग्रसचे पदाधिकारी
---------------------------------------------------
भिवंडीतील गायत्रीनगर-रामनगर येथे जमा झालेल्या जुन्या कचऱ्याचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. त्यापैकी ओला कचरा व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करून ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत; तर सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक बिलिंगद्वारा गठ्ठे बनवण्यात येणार आहे. जुना कचरा डी-कंपोज झाल्‍यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
- दीपक झिंजाड, उपायुक्त, भिवंडी महापालिका